अंबेदरेच्या वाड्या-वस्त्या बिबट्याच्या दहशतीखाली
By admin | Published: December 28, 2014 09:58 PM2014-12-28T21:58:00+5:302014-12-29T00:02:46+5:30
ग्रामस्थ भयभीत : रात्री शेतात जाणे बनले अशक्य
सातारा : अंबेदरे येथील जाधववाडी येथे मध्यवस्तीत रात्रीच्या वेळी प्रल्हाद मोरे यांच्या घरात बिबट्याने शेळीवर हल्ला केला. शेळीच्या ओरडण्याने घरातील सर्वजण जागे झाल्याने बिबट्या पसार झाला. बिबट्याने शेळीच्या मानेला चावा घेतल्याने ती जखमी झाली. येथील वाड्या-वस्त्यांवर सतत बिबट्याचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
सातारा शहरापासून जवळच असलेल्या अंबेदरे परिसरात गेल्या चार महिन्यांपासून बिबट्याचा वावर आहे. डोंगरात म्हशी, गाई, शेळ्या चारावयास गेलेल्या ग्रामस्थांना नेहमीच बिबट्याचे दर्शन होत असते. डोंगरात चरावयास सोडलेल्या शेळ्या ग्रामस्थांच्या जवळून बिबट्या घेऊन जात असल्याने अनेकांनी शेळ्या चरावयास सोडणे बंद केले आहे. गेल्या आठवडाभरापासून धनवडेवाडी, जाधववाडी व भोसलेवाडी या डोंगराशेजारी असलेल्या वाड्यांच्या आसपास रात्रीच्या वेळी बिबट्या येत असल्याची चर्चा असतानाच मध्यरात्रीच्या सुमारास जाधववाडी येथे मध्यवस्तीत प्रल्हाद मोरे यांच्या घरात बिबट्याने शेळीवर हल्ला केला. शेळीच्या आवाजाने घरातील सर्वजण एकदम जागे झाल्याने बिबट्या शेळीला सोडून पसार झाला. आठवड्यापूर्वीच भोसलेवाडी येथेही बिबट्याने हल्ला करून शेळीला ठार मारले. या घटनांनंतर वनपाल सुनील भोसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गावाला भेट दिली.
सध्या परिसरात ज्वारीचे पीक चांगले असल्याने रानडुकरांपासून ज्वारीचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी शेतात रात्रीच्या वेळी मुक्काम करू लागले होते. पण, बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांनी रानात जाणे बंद केले असून, रानडुकरे आणि बिबट्या अशा दुहेरी दहशतीखाली ग्रामस्थ आहेत.
यवतेश्वरपासून सारखळ, गवडीपर्यंतचा परिसर बिबट्याचे वावरक्षेत्र असून, अंबेदरे परिसरात अनेकदा बिबट्या ठाण मांडून बसलेला असतो. ग्रामस्थांच्या पाळीव जनावरांवर बिबट्याने अनेकदा हल्लेही केले असून, अनेक शेळ््या मरण पावल्या आहेत. बिबट्याने जनावर मारल्यास नुकसान भरपाई मिळण्याची प्रक्रिया सुटसुटीत, जलद असावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
संघर्ष उंबरठ्यावर...
वन्यजीव या परिसरापासून नेहमीच जवळ राहिले आहेत; परंतु बिबट्या व रानडुकरांनी अनुक्रमे जनावरे व पिके फस्त करण्यास सुरुवात केल्याने मानव-वन्यजीव संघर्ष उंबरठ्याशी येऊन ठेपला आहे. तो टाळण्याचे आव्हान वनखात्यासमोर आहे.