उत्तर प्रदेशचा राजाभैय्या उदयनराजेंच्या भेटीला; साताऱ्यात केली दीड तास चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 10:54 PM2018-09-16T22:54:44+5:302018-09-16T22:55:40+5:30
सातारा : उत्तर प्रदेशातील बाहुबली तथा राजद नेते रघुराज प्रतापसिंह ऊर्फ राजाभैय्या यांनी रविवारी दुपारी साताºयातील शासकीय विश्रामगृहावर खासदार उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली.
उत्तर प्रदेशच्या राजकारणातील प्रसिद्ध नेते म्हणून रघुराज प्रतापसिंह ऊर्फ राजाभैय्या यांची ओळख आहे. मुलायमसिंह यादव व अखिलेश यादव यांच्या मंत्रिमंडळामध्ये राजाभैया मंत्री होते. सुमारे सहावेळा कुंडा या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून ते निवडून आले. गेल्या निवडणुकीत ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. दरम्यान, रविवारी दुपारी राजाभैय्या अकलूज येथील धवलसिंह मोहिते-पाटील व त्यांच्या सहकाºयांसह साताºयात आले. विश्रामगृहावर खासदार उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. खासदार उदयनराजे यांनी राजाभैय्या यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले.
राजाभैय्या म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे माझे आदर्श आहेत. माझ्या घरातील देव्हाºयात देवांशेजारी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतीमा आहे. पहिल्यापासूनच छत्रपती घराण्यावर माझे विशेष प्रेम आहे. मी सोमवारी रायगड येथे जाणार आहे. छत्रपतींच्या समाधीवर नतमस्तक होणार आहे. तलवारीच्या जोरावर मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले, शिवछत्रपतींचे वंशज म्हणून खासदार उदयनराजे यांच्याबद्दल नितांत आदर आहे. उदयनराजे भोसले यांना उत्तर प्रदेशात येण्याचे आमंत्रण देणार आहे. त्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर ठेवणार नाही. जंगी स्वागत करू.’
यावेळी अभिनेते मुकेश तिवारी, अकलूजचे धवलसिंह मोहिते-पाटील, संग्राम बर्गे, जितेंद्र खानविलकर आदी उपस्थित होते.