वाळूमाफियाकडून तलाठ्याला मारहाण : खटाव तालुक्यात अवैध वाहतूक , डंपर अंगावर घालण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 09:41 PM2018-01-06T21:41:06+5:302018-01-06T21:43:43+5:30
पुसेगाव : महसूल न भरता वाळूची वाहतूक करणारा डंपर अडविल्याच्या कारणावरून कटगुणचे तलाठी किरण पवार यांना मारहाण करण्यात आली. तसेच चालकाने अधिकाºयांच्या अंगावर डंपर घालून त्यांना जीवे मारण्याचा
पुसेगाव : महसूल न भरता वाळूची वाहतूक करणारा डंपर अडविल्याच्या कारणावरून कटगुणचे तलाठी किरण पवार यांना मारहाण करण्यात आली. तसेच चालकाने अधिकाºयांच्या अंगावर डंपर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सचिन राजगेसह डंपर चालक वलेकर व अज्ञात व्यक्तीविरोधात पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी मंडलाधिकारी व तलाठी यांचे पुसेगाव, बुध, खटाव मंडलामध्ये शुक्रवारी रात्रीपासून गस्त सुरू होती. मंडलाधिकारी विठ्ठल तोडरमल व तलाठी किरण पवार यांनी वर्धनगड बसथांब्यापासून थोड्या अंतरावर शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास पुसेगाव बाजूकडून कोरेगावच्या दिशेने जाणारा डंपर (एमएच ११ बीडी ७६) रोखला. चालक वलेकर याच्याकडे वाळूची महसुली पावती व वाहतूक परवान्याची विचारणा केली. त्यावेळी चालक वलेकर याने वाळू पावती व परवाना नसल्याचे सांगितले.
हा प्रकार सुरू असतानाच पाठीमागून काळ्या रंगाच्या कारमधून सचिन राजगे व अंदाजे ४० वर्षांचा एक अनोळखी इसम त्याठिकाणी आला. हा सर्व प्रकार डंपर चालकाने राजगे यास सांगितला. मंडलाधिकारी तोडरमल यांनी ‘वाळूचा डंपर पुसेगाव पोलिस ठाण्यात घ्यावा’, असे चालकाला सांगितले. त्यावेळी ‘घाटात डंपर वळणार नाही, वर्धनगड घाट उतरल्यावर गाडी वळवून घेऊ,’ असे चालकाने सांगितले.
तलाठी किरण पवार यांची कार डंपरच्या मागे तर सचिन राजगे याची कार तलाठी पवार यांच्या गाडीच्या मागे होती. अचानकच डंपर चालकाने कोरेगाव बाजूकडे असलेल्या वीट भट्टीकडे जाणाºया रस्त्यावर वाळूचा डंपर वळविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मंडलाधिकारी तोडरमल व तलाठी किरण पवार हे गाडीतून तत्काळ खाली उतरले. त्याचवेळी डंपर चालकाने गाडीतील वाळू खाली केली. गाडी पळून घेऊन जाणार, असे लक्षात येताच मंडलाधिकारी तोडरमल व तलाठी पवार यांनी डंपरच्या समोर उभे राहून त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सचिन राजगे याने ‘सर्वांना गाडी खाली चिरडून टाक,’ असे डंपर चालकाला सांगितले. त्यानुसार चालकाने मंडलाधिकारी व तलाठी यांच्या अंगावर डंपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ते बाजूला सरले आणि त्या संधीचा फायदा घेत डंपर चालक कोरेगावच्या दिशेने गाडी घेऊन पसार झाला.
सचिन राजगे याने तलाठी किरण पवार यांना डंपरवर का कारवाई करताय याचा जाब विचारत धक्काबुक्की करून मारहाण केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी तलाठी किरण पवार यांनी सचिन राजगे, चालक वलेकर व अज्ञात व्यक्तीविरोधात पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड हे करीत आहेत.
तहसीलदारांची तातडीने भेट...
तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना याबाबतची माहिती कळताच त्यांनी तातडीने पुसेगावला भेट देऊन मंडलाधिकारी व सर्व तलाठी यांच्याकडून झालेल्या घटनेची माहिती घेतली. तसेच संबंधितांवर कायदेशीररीत्या गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले.
राजगे राजकीय पदाधीकाऱ्याचाच नातलग....
वाळू तस्करी रोखण्यासाठी महसूल प्रशासन प्रयत्न करीत असते. मात्र वाळू माफियांच्याकडून अधिकाºयांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, मारहाण व धक्काबुक्कीचे प्रकार सुरू असतात. सचिन राजगे हा माणमधील एका राजकीय पदाधिकाºयाचा नातलग असल्याची चर्चा पुसेगाव पोलिस ठाण्याच्या आवारात सुरू होती.