शेतकऱ्यांच्या वर्गणीतून ओढ्यात जलवाहिन्या
By admin | Published: March 30, 2017 11:31 PM2017-03-30T23:31:10+5:302017-03-30T23:31:10+5:30
गाळ काढण्यास प्रारंभ : सात वर्षांनंतर खळाळणार आदर्कीचा ओढा
आदर्की : आदर्की-हिंगणगाव बारमाही वाहणारा ओढा धोम-बलकवडी कालव्याच्या कामामुळे सात वर्षांपासून कोरडा पडत होता. त्यामुळे आदर्की खुर्द, आदर्की बुद्रुक, हिंगणगावात पाणीटंचाई होऊन शेतकरी वर्गाच्या विहिरी कोरड्या पडत होत्या. यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी खोदकामासाठी मशीन उपलब्ध करून दिली. सिमेंट पाईप टाकण्यासाठी लोकवर्गणी तर पाईप टाकून मुजवण्यासाठी शरयू फाउंडेशनने मशीन दिल्याने आदर्की-हिंगणगाव ओढा सात वर्षांनी खळाळणार आहे.
फलटण-कोरेगाव तालुक्याच्या सीमेवरून हजारो हेक्टर डोंगर परिसरातून आदर्कीच्या ओढ्याला पावसाचे पाणी वाहून येत होते. त्यामुळे आदर्कीचा ओढा बारमाही वाहत होता. सात वर्षांपूर्वी आदर्की खुर्द परिसरात धोम-बलकवडी कालव्याचे खोदकाम सुरू झाले. त्यावेळी जमिनीपासून ३० ते ४० फूट खोल कालवा गेल्याने ओढ्याचे पाणी व नैसर्गिक स्त्रोत तुटल्याने ओढा कोरडा पडू लागला. त्यामुळे आदर्की खुर्द, आदर्की बुद्रुक, हिंगणगाव परिसरात पाणी टंचाई भासत होती.
आदर्की खुर्द गावाला कालवा वळसा घालून भरून वाहिला तरी ओढा मात्र कोरडाच राहत होता.
ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी ओढा व कालवा याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देऊन खुदाईसाठी स्वत: मशीन उपलब्ध करून दिले तर आदर्की खुर्द, आदर्की बुद्रुक येथील अंदाजे ८० शेतकऱ्यांनी लोकवर्गणी, तरुण मंडळांनी पुढाकार घेऊन ४५ सिमेंट पाईप जमिनीत गाडून ओढा-कालवा असे दारे काढून दिले. चारीत पाईप गाडण्यासाठी मशीन उपलब्ध करून दिल्यामुळे काम पूर्ण झाले आहे.