उदयनराजेंच्या शक्तिप्रदर्शनाला मित्रपक्षांची ताकद मिळणार ?

By दीपक देशमुख | Published: April 17, 2024 10:13 PM2024-04-17T22:13:44+5:302024-04-17T22:14:18+5:30

साताऱ्यात रॅली : फडणवीस, अजित पवार राहणार उपस्थित

Will Udayanraje will get strength of ncp and shiv sena | उदयनराजेंच्या शक्तिप्रदर्शनाला मित्रपक्षांची ताकद मिळणार ?

उदयनराजेंच्या शक्तिप्रदर्शनाला मित्रपक्षांची ताकद मिळणार ?

सातारा: जिल्ह्यातील दोन दिग्गज नेते खासदार उदयनराजे भाेसले आणि आमदार शशिकांत शिंदे यांची टक्कर लोकसभेत होणार असल्यामुळे राज्यात या लढतीची उत्सुकता आहे. शशिकांत शिंदे यांनी सोमवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल केल्यानंतर आता उदयनराजे भोसले यांच्याही शक्तिप्रदर्शनाला महायुतीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. तथापि, उमेदवारी मिळण्याची शक्यता असूनही पत्ता कट झालेल्या नितीन पाटील यांचे बंधू मकरंद पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची ताकद या शक्तिप्रदर्शनाला मिळणार का? याची उत्सुकता वाढली आहे.

सातारा येथे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी शिरवळ ते कऱ्हाडपर्यंत रॅली काढली. तसेच उमदेवारी अर्ज भरतानाही शरद पवार, जयंत पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. यावेळी महाविकास आघाडीतून उमेदवारीसाठी ज्यांची नावे चर्चेत होती, त्या खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, सत्यजित पाटणकर यांच्यासह सारंग पाटील, सुनील माने हे सर्व रॅलीत अग्रभागी होते. त्यामुळे मंगळवारी खासदार उदयनराजेंच्या रॅलीची उत्सुकता वाढली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री यांनाही आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या रॅलीत शक्तिप्रदर्शनासाठी महायुतीतून ज्यांची नावे चर्चेत होती, त्यांना कसे सोबत आणणार? हा प्रश्न उपस्थित होणार आहे. तिन्ही प्रमुख पक्षांतील नाराजांना सोबत घेण्यासाठी त्यांची समजूत काढावी लागणार आहे. प्रामुख्याने आमदार मकरंद पाटील काय भूमिका घेतात, याची उत्सुकता लागली आहे.

तिकिटाच्या रस्सीखेचीमुळे कटुता
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीला वाईत खिंडार पडले. आमदार मकरंद पाटील अजित पवार गटाला जाऊन मिळाले. यानंतर राजकीय गणिते मांडून अजित पवार यांनी सातारा जागेवर दावा सांगितला होता. नितीन पाटील यांची उमेदवारी निश्चित समजली जात होती. त्यांनी तशी तयारीही सुरू केली होती. मात्र, उदयनराजेंनी दिल्लीत आपले वजन वापरले. अखेर साताराची जागा भाजपाने पदरात पाडून घेतली. परंतु, तिकिटाच्या या रस्सीखेचीत मकरंद आबांचे कार्यकर्ते दुखावले आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करावी लागणार आहे.

शिंदेसेनेचीही करावी लागणार मनधरणी
दुसरीकडे शिंदेसेनेचे पुरुषोत्तम जाधव हेही उमेदवारी अर्ज घेऊन गेले आहेत. ते अर्ज भरण्यावर ठाम आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघात पक्षाचे दोन आमदार असूनही त्यांच्या उमेदवारीबाबत कुणी आग्रह धरला नसल्याची खंत त्यांना आहे. त्यामुळे ते अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्यांचाही विचार करावा लागणार आहे. हे सर्व जुळवून आणण्यासाठी उदयनराजे भोसले यांना कसरत करावी लागणार हे निश्चित.

Web Title: Will Udayanraje will get strength of ncp and shiv sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.