राज ठाकरे २२ मे पासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर, दौऱ्यामुळे मनसेत चैतन्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 04:34 PM2018-05-21T16:34:32+5:302018-05-21T16:34:55+5:30
सामान्यांबरोबरच सर्वच स्तरातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य तसेच केंद्र शासन अपयशी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे २२ मे पासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत.
कणकवली : सामान्यांबरोबरच सर्वच स्तरातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य तसेच केंद्र शासन अपयशी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे २२ मे पासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत.
या दौऱ्यात ते जनतेच्या विविध समस्या जाणून घेणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे मनसैनिकांमध्ये निश्चितच नवचैतन्य संचारेल, असा विश्वास मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी येथे व्यक्त केला.
संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अमोल सावंत, दत्ताराम बिडवाडकर, शैलेंद्र नेरकर उपस्थित होते.
परशुराम उपरकर पुढे म्हणाले, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांच्या दौऱ्यानंतर राज ठाकरे सिंधुदुर्गात येत आहेत. कोकणातील जनतेच्या प्रश्नांची माहिती ते या दौऱ्यात घेणार आहेत. सध्याच्या शासनकर्त्यांबद्दल जनतेत नाराजी असून त्यांच्या समस्या राज ठाकरे ऐकून घेणार आहेत.
नाणार तसेच इतर प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्या लढ्याला पाठबळ देण्यासाठी ठोस निर्णय या दौऱ्यात ते घेतील. त्यामुळे जनतेलाही या दौऱ्याबाबत उत्सुकता आहे. तसेच राज ठाकरेंकडे जनता वेगळ्या अपेक्षेने बघत आहे.
२२, २३ मे रोजीचा दौरा कार्यक्रम
राज ठाकरे २२ मे रोजी सायंकाळी ४ वाजता सावंतवाडी येथे दोडामार्ग, वेंगुर्ले, सावंतवाडी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता कुडाळ येथे पत्रकार व मान्यवरांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. रात्री कुडाळ येथे मुक्काम केल्यानंतर २३ मे रोजी सकाळी ९.३० वाजता कुडाळ येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता मालवण येथे पदाधिकारी बैठक होईल.
सायंकाळी ४ वाजता देवगड येथे कार्यालय उद्घाटन व देवगड पदाधिकारी बैठक होईल. सायंकाळी ५.३० वाजता कणकवली येथे वैभववाडी व कणकवली तालुक्यातील पदाधिकाऱ्याची बैठक होईल. कणकवली येथे रात्री मुक्काम केल्यानंतर २४ मे रोजी सकाळी ९ वाजता राज ठाकरे राजापूरकडे पुढील दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत, असेही परशुराम उपरकर यांनी यावेळी सांगितले.