उशिरा आलेल्या मोहोरामुळे २५ टक्के आंबा झाडांवरच!
By admin | Published: May 19, 2017 12:39 AM2017-05-19T00:39:37+5:302017-05-19T00:39:37+5:30
उशिरा आलेल्या मोहोरामुळे२५ टक्के आंबा झाडांवरच!
मेहरून नाकाडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शेवटच्या मोहोराचा आंबा वाढत्या उष्म्यामुळे तयार झाला असून, झाडावरच पिकू लागला आहे. अवकाळी पावसाचा फटका या आंब्याला बसला आहे. सध्या वाशी मार्केटमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात येथून आंबापेट्या विक्रीला येत आहेत. महाराष्ट्रातून दररोज एक लाख, तर कर्नाटकमधून २५ हजार पेट्यांची आवक सुरू आहे. यावर्षी वाशी मार्केटमध्ये सहा राज्यातून हापूस विक्रीला येत आहे. आवक वाढल्यामुळे दर कोसळले असून, शेतकऱ्यांना दहा वर्षांपूर्वीचा दर आता मिळत आहे.
कोकणातून आलेल्या हापूसची विक्री १०० ते २०० रूपये डझन दराने वाशी मार्केटमध्ये सुरू आहे. कर्नाटक हापूस ३० ते ३५ रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. विक्रेते किलोवर मिळणारा कर्नाटक, गुजरातसह अन्य राज्यातील आंबा रत्नागिरी, देवगड हापूस सांगून ग्राहकांची फसवणूक करीत आहेत. यावर्षी सरासरीपेक्षा अधिकतम पाऊस होऊनही आॅक्टोबरपासून थंडी सुरू झाली. जमिनीत ओलावा असताना मोहोर आला. परंतु पुनर्मोहोरामुळे आंब्याच्या उत्पादनावर परिणाम झाला. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून कोकणातून हापूस बाजारात जाऊ लागला. सुरूवातीला पेटीला २००० ते १०,००० रूपयांपर्यंत दर देण्यात आला. मात्र, नंतर तो हळूहळू खाली आला. कोकणातील हापूसबरोबरच कर्नाटकचा हापूस सुरू झाला. महाराष्ट्राबरोबर केरळ, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, गुजरात आदी सहा राज्यातून हापूस मुंबईत आला. रत्नागिरी हापूसला त्याचा चांगलाच फटका बसला. दिसायला बऱ्यापैकी सारखा असलेला परराज्यातील आंबा रत्नागिरी, देवगड हापूस म्हणून विकण्यास सुरूवात झाली. त्याचा मोठा फटका कोकणातील शेतकरी, बागायतदारांना बसला आहे.
एका बाजूला बाजारपेठेत हापूसला अनेक समस्या असताना दुसऱ्या बाजूला अजूनही मोठ्या प्रमाणात आंबा झाडावरच आहे. थंडी उशिरापर्यंत पडली असल्यामुळे झाडांना पालवी येत राहिली. त्यामुळे उशिरापर्यंत मोहोर येत राहिला. उशिरा आलेला हा मोहोर अजूनही झाडावर आहे. जवळजवळ २५ टक्के पीक अजूनही झाडावर आहे. आता पाऊस पडत असल्यामुळे यातील कितीसे पीक हातात येईल याबाबत बागायतदारही साशंक आहेत. यातील बहुतांश आंबा कॅनिंगलाच टाकला जाण्याची शक्यता आहे.