सौरकुंपणास ९० टक्के अनुदान
By Admin | Published: July 1, 2016 10:35 PM2016-07-01T22:35:23+5:302016-07-01T23:40:29+5:30
दीपक केसरकर : हेवाळे, बाबरवाडीत हत्ती नुकसानग्रस्त भागाची पाहणी
दोडामार्ग : तिलारी खोऱ्यात शेतकऱ्यांच्या शेती बागायतींचे नुकसान करणाऱ्या जंगली हत्तींच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांना सौरकुंपणासाठी ९० टक्के अनुदान देण्याकरिता प्रयत्न करण्याचे आश्वासन राज्याचे वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.
तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हेवाळे पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नाबार्डमधून निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. शुक्रवारी पालकमंत्री केसरकर यांनी तिलारी खोऱ्यातील हेवाळे, बाबरवाडी परिसरात उपद्रव माजविणाऱ्या जंगली हत्तीबाधित क्षेत्राचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबूराव धुरी, गणेशप्रसाद गवस, जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र म्हापसेकर, हेवाळे गावचे सरपंच संदीप देसाई उपस्थित होते. सर्वप्रथम पालकमंत्री केसरकर यांनी हत्ती नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी सरपंच संदीप देसाई व वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते. हत्तीबाधितांना तातडीने नुकसानभरपाई दिली जाईल. त्याचबरोबर हत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी खंदक खोदले जातील. या व्यतिरिक्त शेतीच्या संरक्षणासाठी सौरकुंपण घालण्याकरिता शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान उपलब्ध करून देण्याचेही आश्वासन पालकमंत्री केसरकर यांनी दिले. (प्रतिनिधी)
हेवाळे पुलासाठी नाबार्डमधून निधी
गेल्या अनेक वर्षांपासून
प्रलंबित असलेल्या हेवाळे
पुलाचीही ग्रामस्थांसह पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने सरपंच संदीप देसाई यांनी पालकमंत्र्यांना पुलाच्या बांधकामाबाबत निवेदन दिले. नाबार्डच्या योजनेमधून पुलाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी गावकऱ्यांना दिले.