अमिता कावतकर मिस सुंदरवाडी
By admin | Published: February 9, 2015 10:48 PM2015-02-09T22:48:34+5:302015-02-10T00:01:42+5:30
सावंतवाडीत महोत्सव : देवगडच्या तन्वी चांदोस्कर सौभाग्यवती सुंदरी
सावंतवाडी : ‘सुंदरवाडी महोत्सव २०१५’ मध्ये सौंदर्यवतींच्या ‘मिस सुंदरवाडी’ या स्पर्धेत रत्नागिरीच्या अमिता कावतकर हिने विजेतेपदाचा मुकुट प्राप्त केला. तर सौभाग्यवतींकरिता घेण्यात आलेल्या ‘सौ. सुंदरवाडी’ या स्पर्धेत देवगडच्या तन्वी चांदोस्कर या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. सुंदरवाडी पर्यटन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रसिकांनी अफाट गर्दी केली होती. सायंकाळी ६ वाजता स्थानिक कलाकारांनी आॅर्केस्ट्रा सादर केला. यावेळी नवनवीन गाणी सादर करीत आॅर्केस्ट्रातील सर्व गायक, वाद्य कलाकारांनी रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळविली. सलग दोन तास कार्यक्रम सादर केलेल्या या आॅर्केस्ट्रा कलाकारांच्या कलागुणांना उपस्थितांनी दाद दिली. याच दरम्यान प्रसिध्द मराठी सिने अभिनेत्री सई ताम्हणकर यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. त्यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या ‘मिस सिंधुदुर्ग’ व ‘सौभाग्यवती सुंदरवाडी’ या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. दोन्ही स्पर्धांमध्ये स्थानिकांसह महाराष्ट्र व गोवा राज्यातील विविध भागातील कलाकारांनी सहभाग घेतला. स्थानिक महिलांनी आपल्या सुंदर अशा कॅटवॉकमध्ये व्यासपीठावर येऊन सर्व प्रेक्षकांची व परीक्षकांची मने जिंकली. या सौदर्यवतींच्या अप्सरांना लाजविणाऱ्या अशा दिलखेचक अदांनी रसिक घायाळ होत होते. या सौदर्यवतींनी विविध नृत्य, वेशभूषेत विविध कार्यक्रम सादर केले. या दोन्ही स्पर्धांमध्ये चाळीस स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. ‘सौभाग्य सुंदरवाडी’ ची मानकरी देवगड येथील तत्वी चांदोसकर हिला रोख २५ हजार रुपये, द्वितीय गौरी बांदेकर (बांदा) हिला १५ हजार, तर तृतीय क्रमांक विजेती सृष्टी पेडणेकर (सावंतवाडी) हिला १० हजार रुपयांचे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. तसेच बेस्ट हेअरस्टाईल मोहिनी मडगावकर, बेस्ट कॅटवॉक तन्वी चांदोसकर, बेस्ट कॉस्च्युम प्रिती सावंत (सावंतवाडी), बेस्ट स्माईल सृष्टी पेडणेकर, फोटोजेनिक कोमल राय यादव (सावंतवाडी), बेस्ट पर्सनॅलिटी तन्वी चांदोसकर, बेस्ट डान्सर मोहिनी मडगावकर यांना पारितोषिके देण्यात आली. सर्व विजेत्यांना रोख बक्षिसे व स्मृतिचिन्ह देऊन उपस्थितांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब, सनी कुडाळकर, मंदार नार्वेकर, अॅड. दिलीप नार्वेकर, विकास सावंत, डॉ. जयेंद्र परूळेकर, संदीप कुडतरकर, सुधीर आडिवरेकर, प्रमोद सावंत, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महिला काँगे्रस तालुकाध्यक्ष गीता परब, शहराध्यक्ष स्रेहा सावंत, चित्रा भिसे, राखी कळंगुटकर, उन्नती धुरी, भारती कदम, नूतन सावंत, शिला सावंत, वैष्णवी ठोंबरे, आलिशा माठेकर, साक्षी वंजारी, बेला पिन्टो, माया चिटणीस तसेच सर्व विभागीय आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत
घेतली. (वार्ताहर)
विजेत्यांचा पारितोषिक देऊन गौरव
‘मिस सुंदरवाडी’ स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेती अमिता कावितकर हिला २५ हजार रुपयांचे पारितोषिक उपस्थितांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक विजेती कणकवली येथील श्वेता सुद्रिक हिला १५ हजार, तृतीय विजेती मडगावच्या मर्लिन डिसिल्व्हा हिला १० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. तसेच बेस्ट हेअरस्टाईल मर्लिन डिसोजा, बेस्ट कॅटवॉक अश्विनी शिवणे (रत्नागिरी), बेस्ट कॉस्च्युम अमिता कवितकर, बेस्ट स्माईल स्रेहाली सावंत (रत्नागिरी), बेस्ट डान्सर भक्ती जामसंडेकर (सावंतवाडी) यांना गौरविण्यात आले.