भात खरेदी तातडीने करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

By admin | Published: May 20, 2015 11:39 PM2015-05-20T23:39:42+5:302015-05-20T23:58:34+5:30

विनायक राऊत, वैभव नाईक : पावसाळा तोंडावर, शेतकरी अडचणीत

Assurances of District Collector to make immediate purchase of rice | भात खरेदी तातडीने करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

भात खरेदी तातडीने करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

Next

सिंधुदुर्गनगरी : पावसाळा तोंडावर आला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भाताची खरेदी न झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. त्यामुळे तत्काळ भात खरेदी करावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यांनी येत्या चार दिवसात कुडाळ व इतर शासकीय गोदामे ताब्यात घेऊन भात खरेदी तातडीने करतो, असे आश्वासन दिल्याची माहिती खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी संयुक्तरित्या आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात खरेदी तत्काळ सुरु करावी, या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत खासदार राऊत व आमदार वैभव नाईक बोलत होते. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, तालुकाध्यक्ष सुरेश शिरसाट, नागेंद्र परब व अन्य उपस्थित होते.
यावेळी खासदार राऊत म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील या हंगामातील शेतकऱ्यांकडील भात खरेदी न झाल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडलेले आहेत. एकीकडे अवकाळी पावसामुळे शेती बागायतदारांचे झालेले नुकसान व दुसरीकडे शेतात पिकलेले भात घरात पडून राहिल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे नित्याचे खर्च भागविणे मुश्किल झालेले आहे आणि त्यामुळे शेतकरी कर्जाच्या बोजात भरडला जाण्याची शक्यता आहे.
राज्यात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या ही वस्तुस्थिती लक्षात घेता या जिल्ह्यातील अन्य कोणत्याही शेतकऱ्यावर अशी पाळी येवू नये म्हणून तत्काळ शेतकऱ्यांकडील भात खरेदी होणे आवश्यक आहे. या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली असता कुडाळ व इतर शासकीय गोदामे ताब्यात घेऊन तातडीने भात खरेदी केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सरकारवर टीका करत आता कुठे गेले अच्छे दिन? असे सांगत आरोप केला होता.
याबाबत खासदार राऊत यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, मोदी सरकारने एक वर्षाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात समाजोपयोगी कामे केली. स्वातंत्र्यकाळानंतर आजपर्यंत हजारो कायद्यांचा उपयोग होत नाही हे लक्षात येताच आतापर्यंत मोदी सरकारने दोन विधेयके आणून तब्बल ३५०० कायदे कालबाह्य केले. त्यामुळे लोकांचे, सर्वसामान्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्यास सुरुवात झाली. पंतप्रधान विमा योजना लागू केली. तसेच पूर्वी अवकाळी पाऊस किंवा कोरडा दुष्काळ पडला तर ५० टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच नुकसान भरपाई मिळत होती.
आता तर ३३ टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत लागू करण्याचा निर्णय झाला असून तसा सर्व्हेही करायला सुरुवात झाली आहे. यासारखी अनेक लोकाभिमुख कामे मोदी सरकारने केल्याची माहिती खासदार राऊत यांनी दिली. (प्रतिनिधी)


आंबा उत्पादकांचे कर्ज माफ करावे
अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्गातील शेकडो आंबा उत्पादकांचे कोट्यवधी रुपये नुकसान झाले आहे. आंबा उत्पादनासाठी सोसायटी व बँकांकडून घेतलेले कोट्यवधी रुपये शासनाने माफ करावे अशी मागणी शासनाकडे केली आहे.



तलाठ्यांचा संप आज मिटणार ?
आचऱ्याचे मंडल अधिकारी मुंबरकर यांच्यावर करण्यात आलेली कारवाई मागे घ्यावी या मागणीसाठी १६ मे पासून जिल्ह्यात तलाठ्यांनी रजा आंदोलन पुकारले आहे. याबाबत खासदार विनायक राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, तलाठ्यांचा संप मिटण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केले जात असून, आजच्या आज संप मिटेल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले.


चार दिवसात निर्णय?
वाळू प्रश्न हरित लवादाकडे प्रलंबित असल्याने येत्या चार दिवसात याप्रकरणी निर्णय होण्याची शक्यता खासदार विनायक राऊत यांनी वर्तविली आहे.

Web Title: Assurances of District Collector to make immediate purchase of rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.