देशातील उत्कृष्ट स्कुबा डायव्हींग हॉलिडे स्पॉट ‘तारकर्ली’ पर्यटनक्षेत्र

By Admin | Published: April 17, 2015 10:46 PM2015-04-17T22:46:02+5:302015-04-18T00:03:01+5:30

‘हॉलिडे आयक्यू डॉट कॉम’ने केला सर्व्हे

The best scuba-diving holiday spot in the country is 'Tararkali' tourism area | देशातील उत्कृष्ट स्कुबा डायव्हींग हॉलिडे स्पॉट ‘तारकर्ली’ पर्यटनक्षेत्र

देशातील उत्कृष्ट स्कुबा डायव्हींग हॉलिडे स्पॉट ‘तारकर्ली’ पर्यटनक्षेत्र

googlenewsNext

मालवण : देशी-विदेशी पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या तारकर्ली पर्यटन क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. देशातील पर्यटन क्षेत्रांचा अभ्यास करणाऱ्या हॉलिडे आयक्यू डॉट कॉम या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेने केलेल्या सर्व्हेत तारकर्ली हे जागतिक दर्जाच्या भारतातील सहा हॉलिडे स्पॉटमध्ये असल्याचे आपल्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे.
पंचवीस वर्षापूर्वी जगाच्या पर्यटन नकाशावर नाव पटकावलेल्या तारकर्लीला आदरातिथ्यात सर्वोत्तम असल्याचेही हॉलिडे आयक्यूने गतवर्षी जाहीर केले होते. १९९०च्या दशकात निसर्गसौंदर्याने नटलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटनातून विकास साधण्याच्यादृष्टीने तत्कालिन काँग्रेस नेते कै. वाय. डी. सावंत आणि तत्कालिन खासदार सुधीर सावंत यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. सावंतद्वयींच्या या प्रयत्नाने स्वच्छ किनारा लाभलेल्या तारकर्ली गावाला जगाच्या पर्यटन नकाशावर मानाचे स्थान मिळाले. युती सरकारच्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाल्यानंतर तारकर्लीसह सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे देशी- विदेशी पर्यटकांची पावले वळू लागली.
अलिकडच्या काळात स्नॉर्कलिंग, स्कुबा डायव्हींग यासारख्या जलक्रीडा सुरू झाल्याने मालवण, तारकर्ली, देवबागला देशी- विदेशी पर्यटकांनी पसंती दिली. चार दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हॉलिडे आयक्यू या ट्रॅव्हल्स कंपनीने भारतातील पर्यटनस्थळांचा जो सर्व्हे केला त्या सर्व्हेत भारतातील स्कुबा डायव्हींगमधील नामांकीत हॉलिडे स्पॉट म्हणून देशी- विदेशी पर्यटकांनी आपल्या पसंतीची मोहोर उठवली त्यात लक्षद्विप, गोवा, मुर्डेश्वर, अंदमान, पाँडेचेरी आणि तारकर्ली या सहा पर्यटनस्थळांचा समावेश आहे.
हॉलिडे आयक्यू या कंपनीच्या संकेतस्थळावर तारकर्लीतील पर्यटनाची महती प्रसिद्ध करताना तारकर्लीचे बॅकवॉटर, वॉटर स्पोर्टस, डॉल्फीनची सफर, बोटींगची सेवा ही दर्जेदार असल्याचे म्हटले आहे. यात प्रामुख्याने स्कुबा डायव्हींग या जलक्रीडेची उत्तम सेवा दिली जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. भारतातील स्कुबा डायव्हींग हॉलिडे स्पॉटच्या प्रमुख सहामध्ये तारकर्लीने मोहोर उठविल्याने पर्यटनप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The best scuba-diving holiday spot in the country is 'Tararkali' tourism area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.