भुईबावडा, करुळ घाटात बाजूपट्ट्या खचल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 10:51 PM2017-10-02T22:51:51+5:302017-10-02T22:51:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वैभववाडी : सह्याद्री पट्ट्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे भुईबावडा घाटात तीन ठिकाणी, तर करुळ घाटात एका ठिकाणी रस्त्याची बाजूपट्टी खचून संरक्षक भिंती ढासळल्या आहेत. त्यामुळे भुईबावडा घाटात सध्या तीन ठिकाणांवरून एकेरी वाहतूक सुरू ठेवली आहे. बाजूपट्ट्या खचलेल्या ठिकाणी भगदाड पडून अतिवृष्टीत रस्ता खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यामुळे दोन्ही घाटमार्गांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. करुळ आणि भुईबावडा घाटांच्या परिसरात गेला आठवडाभर दररोज दुपारनंतर ढगफुटीसारखा पाऊस सुरू आहे. त्याचा सर्वाधिक फटका दोन्ही घाटमार्गांना बसत आहे. आठवडाभरात दोन्ही घाटांत चारवेळा दरडी कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे दरडी कोसळून करुळ आणि भुईबावडा हे दोन्ही घाटमार्ग तासभर बंद होते. रविवारच्या अतिवृष्टीमुळे भुईबावडा घाटात तीन ठिकाणी रस्त्याच्या बाजूपट्ट्या खचून संरक्षण भिंतीही खचल्या आहेत. तसेच करुळ घाटाच्या मध्यावरील विश्रांती स्थळानजीक रस्त्याची बाजूपट्टी खचून अगदी रस्त्यालगतच भगदाड पडले आहे. रात्रीच्या वेळी हे भगदाड अपघातास कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. दोन्ही घाटातील गटारे मोकळी नसल्याने पाण्याचा प्रवाह वेगाने रस्त्यावरुन वाहतो. त्यामुळे घाटातील रस्त्याच्या बाजूपट्ट्या खचून संरक्षण भिंतीही ढासळू लागल्या आहेत.
रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने दोन्ही घाटमार्गांच्या बाजूपट्ट्या खचून रस्त्यालगत भगदाड पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे घाटमार्गांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. गेला आठवडाभर सह्याद्री पट्ट्यात वाढलेला पावसाचा जोर आणखीन काही दिवस कायम राहिला तर पावसाच्या कालावधीत दोन्ही घाटातून प्रवास करणे जीवघेणे ठरण्याची शक्यता आहे.