स्फोटप्रकरणी श्वानपथकाला पाचारण
By admin | Published: July 10, 2014 12:12 AM2014-07-10T00:12:39+5:302014-07-10T00:17:46+5:30
बेकायदा जिलेटीन स्फोट प्रकरणी गुन्हा दाखल
बांदा : कास येथील तेरेखोल नदीपात्रात मासेमारीसाठी करण्यात आलेल्या बेकायदा जिलेटीन स्फोट प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, बांदा पोलिसांनी अद्यापपर्यंत एकाही संशयिताला ताब्यात घेतले नाही. घटना घडून दहा दिवस उलटल्यानंतर पोलिसांनी कास येथे श्वानपथकाला पाचारण केल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र, पाऊस असल्याने श्वान जाग्यावरच घुटमळल्याने पोलिसांना हात हलवत माघारी परतावे लागले.
कास तेरेखोल नदीपात्रात घोणसे येथे १ जुलै रोजी जिलेटीनच्या साहाय्याने मासेमारी करीत असताना जिलेटीन हातात फुटल्याने सहा युवक जखमी झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी किशोर पुंडलिक पंडित घनश्याम शांताराम पंडित, सुभाष उर्फ महादेव भिवा भाईप (सर्व रा. कास) व गुलजार अब्दुल रज्जाक खान, गौरेश मंगलदास काणेकर, लक्ष्मण झिलु सावंत (सर्व रा. बांदा) यांचेवर गुन्हा दाखल केला आहे. यातील किशोर पंडित यांची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर गोवा बांबोळी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बुधवारी सकाळी घटनास्थळाची तपासणी करण्याकरीत सिंधुदुर्ग बॉम्बस्फोट स्कॉडच्या ‘रॉकी’ या श्वानाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळावरील खडकाचा श्वानाला वास देण्यात आला. मात्र, श्वान तेथेच घुटमळले. या परिसरातील काही खडकांचे अवशेष तसेच काही वस्तू तपासी पथकाने ताब्यात घेतल्या. त्यानंतर संशयित सुभाष भाईप व किशोर पंडित यांच्या घराभोवती श्वानाला नेण्यात आले. मात्र श्वान घुटमळल्याने पोलिसांच्या हाती काही लागले नाही. पाऊस सुरु असल्याने तसेच तब्बल दहा दिवसांनंतर पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. यावेळी सहाय्यक पोलीस निरिक्षक जयप्रकाश गुठे, श्वान पथकाचे भालचंद्र दाभोलकर, शाशिकांत कदम, दीपक वाणी, एम. डी. बांदेकर, जनार्दन रेवणकर आदि उपस्थित होते. लवकरच या प्रकरणातील संशयितांवर अटकेची कारवाई करणार असल्याचे जयप्रकाश गुठे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)