सिंधुदुर्ग : चिवला बिच येथील अनधिकृत झोपडी हटविली, कोकण आयुक्तांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 03:19 PM2018-03-23T15:19:18+5:302018-03-23T15:19:18+5:30
मालवण चिवला बिच येथील प्रसन्नकुमार मयेकर यांच्या जागेत बॅनी फर्नांडिस यांनी अनधिकृत उभारलेले झोपडीवजा घर कोकण आयुक्त यांच्या निर्णयानुसार व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मालवण महसूल विभागाकडून हटविण्याची कारवाई गुरुवारी करण्यात आली. मयेकर यांच्या जागेत उभारलेली झोपडी हटविण्यासाठी कायदेशीर मार्गाने लढा देणाऱ्या मयेकर कुटुंबीयांना तब्बल ४७ वर्षांनी न्याय मिळाल्याची भावना प्रसन्न मयेकर यांनी व्यक्त केली.
मालवण : मालवण चिवला बिच येथील प्रसन्नकुमार मयेकर यांच्या जागेत बॅनी फर्नांडिस यांनी अनधिकृत उभारलेले झोपडीवजा घर कोकण आयुक्त यांच्या निर्णयानुसार व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मालवण महसूल विभागाकडून हटविण्याची कारवाई गुरुवारी करण्यात आली. मयेकर यांच्या जागेत उभारलेली झोपडी हटविण्यासाठी कायदेशीर मार्गाने लढा देणाऱ्या मयेकर कुटुंबीयांना तब्बल ४७ वर्षांनी न्याय मिळाल्याची भावना प्रसन्न मयेकर यांनी व्यक्त केली.
चिवला बिच येथील मयेकर यांच्या जागेत पेद्रू पावलो वर्देकर व दुमिंग जुजे फर्नांडिस यांनी झोपड्या उभारल्या होत्या. या झोपड्या हटविण्याबाबत मयेकर कुटुंबीयांनी १९७१ साली मालवण तहसीलदार यांच्याकडे अर्ज दाखल केल्यावर यावरील पुढील कार्यवाहीसाठी हा अर्ज तत्कालीन रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला होता.
जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी पेद्रू वर्देकर व दुमिंग फर्नांडिस या दोघांनाही दोन्ही झोपड्या काढून टाकण्याचा आदेश दिला होता. वर्देकर हे बिनशेती परवानगी घेण्यास असमर्थ ठरल्याने १९९१ मध्ये त्यांची मयेकर यांच्या जागेतील अनधिकृत झोपडी काढून टाकण्यात आली.
दुमिंग फर्नांडिस यांची झोपडी हटविण्याबाबत मयेकर कुटुंबीयांचा गेली ४७ वर्षे लढा सुरू होता. या झोपडीबाबतची आवश्यक कागदपत्रांची फर्नांडिस कुटुंबीय पूर्तता करू न शकल्याने दिवाणी न्यायालय व अप्पर जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी फेरतपासणी अर्ज फेटाळले होते.
याबाबत कोकण अप्पर आयुक्त कोकण विभाग यांच्याकडे झालेल्या सुनावणीत अप्पर जिल्हाधिकारी यांचे आदेश कायम ठेवत फर्नांडिस यांचे फेरतपासणी अर्ज फेटाळून झोपडी हटविण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाच्या कार्यवाहीस महसूल विभागाकडून विलंब होत राहिल्याने प्रसन्नकुमार मयेकर यांनी जिल्हाधिकाऱ्याचे लक्ष वेधले होते. त्यानुसार महसूल प्रशासनाने संबंधित व्यक्तीस नोटीस बजावून ही कारवाई केली.
पोलीस बंदोबस्तात कारवाई
मालवण महसूल विभागाकडून गुरुवारी मयेकर यांच्या जागेतील फर्नांडिस यांची अनधिकृत झोपडी हटविण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी फर्नांडिस कुटुंबीयांकडून कारवाई करण्यापूर्वी विरोध करण्यात आला.
मात्र प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात दुपारी ३ वाजेपर्यंत कारवाई सुरू ठेवत झोपडीवजा घर जमीनदोस्त केले. ही कारवाई नायब तहसीलदार सुहास खडपकर, मंडळ अधिकारी मंगेश तपकीरकर, तलाठी तेली, पोलीस पाटील वासुदेव गावकर, पांडुरंग चव्हाण यांनी केली.