मालवणमध्ये महाविद्यालयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 08:46 AM2018-06-26T08:46:16+5:302018-06-26T08:48:10+5:30
धुरीवाडा येथील साई समर्थ रेसिडेन्सीमध्ये राहणार्या संजना ऊर्फ सोनाली चंद्रशेखर पेंडुरकर (वय 19) या महाविद्यालयीन तरुणीनं सदनिकेतील आपल्या खोलीत ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
मालवण : धुरीवाडा येथील साई समर्थ रेसिडेन्सीमध्ये राहणार्या संजना ऊर्फ सोनाली चंद्रशेखर पेंडुरकर (वय 19) या महाविद्यालयीन तरुणीनं सदनिकेतील आपल्या खोलीत ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. तिच्या मृत्यूने पेंडुरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
संजना हिचे प्राथमिकचे शिक्षण येथील रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये झाले. कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेतल्यानंतर ती सध्या रत्नागिरीतील फिनोलेक्समध्ये तृतीय वर्षात शिकत होती. पंधरा दिवसांपूर्वी ती परीक्षा देऊन धुरीवाडा येथील घरी आली होती. काल सकाळी तिची आई, दोन लहान बहिणींना घेऊन कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या, तर वडील आपल्या सोन्याच्या पेढीवर गेले होते. घरात कोणी नसल्याने सकाळी नऊ ते दुपारी दोनच्या दरम्यान तिने आपल्या खोलीत ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली.
दुपारी घरी परतलेल्या आईने मुलीच्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता आतून दरवाजा लॉक होता. त्यामुळे दुसर्या चावीने दरवाजा उघडला असता संजना ही गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आली. मुलीने आत्महत्या केल्याचे दिसताच पेंडुरकर कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. तिचा मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी नेण्यात आला.
या घटनेची माहिती मिळताच शहरातील सुवर्णकारांनी पेंडुरकर यांच्या धुरीवाडा येथील निवासस्थानी धाव घेतली. उमेश नेरुरकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, यतीन खोत यांच्यासह अन्य सुवर्णकार तसेच लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यावर पोलीस उपनिरीक्षक रेश्मा मोमीन, नीलेश सोनावणे, संतोष गलोले यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. संजना ही उत्कृष्ट गायिकासुद्धा होती.