मळगाव येथील जागृत श्री देव भूतनाथ देवस्थानच्या जत्रोत्सवाला भाविकांची अलोट गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:34 PM2017-11-29T12:34:28+5:302017-11-29T12:54:15+5:30
मळगाव येथील जागृत व नवसाला पावणारा श्री देव भूतनाथ देवस्थानचा जत्रोत्सव गुरुवारी भक्तिमय वातावरणात भाविकांच्या अलोट गर्दीत उत्साहात पार पडला. जत्रोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सकाळपासून केळी-नारळ ठेवणे, नवस बोलणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम पार पडले. रात्री १.३० वाजता मळगाव येथील स्थानिक दशावतार मंडळाचा पौराणिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.
सावंतवाडी : मळगाव येथील जागृत व नवसाला पावणारा श्री देव भूतनाथ देवस्थानचा जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात भाविकांच्या अलोट गर्दीत उत्साहात पार पडला. जत्रोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सकाळपासून केळी-नारळ ठेवणे, नवस बोलणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम पार पडले.
माहेरवाशिणींनी श्री विठलादेवीची ओटी भरून नवसफेड केली. तसेच देवीला कोंब्यांचा मान देण्यात आला. आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर व परिसर उजळून गेला होता. रात्री ११ वाजता ढोलताशांच्या गजरात भूतनाथ देवाची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
पुरुष व महिलांनी लोटांगण घालून नवसफेड केली. लोटांगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. रात्री १.३० वाजता मळगाव येथील स्थानिक दशावतार मंडळाचा पौराणिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. या जत्रोत्सवाचा मळगावसह, माजगाव, वेत्ये, निरवडे, सोनुर्ली, नेमळे आदी भागातील भाविकांनी लाभ घेतला. देवस्थान कमिटी तसेच येथील मित्रमंडळाने विशेष परिश्रम घेतले.