आचऱ्यात डाळपस्वारी परिक्रमा सुरु
By admin | Published: April 12, 2015 12:50 AM2015-04-12T00:50:27+5:302015-04-12T00:50:46+5:30
शाही सोहळा : रामेश्वर देवस्वारीचा अनोखा होडी प्रवास
आचरा : रयतेची सुखदु:खे जाणून घेताना देवस्थानच्या भेटीगाठी घेण्यासाठी आपल्या तरंग स्वारीसह, भालदार, चोपदार, हुद्देदार, अबदागीर, निशाणे, ताशा, वाजंत्रीसह गावच्या परिक्रमेस निघालेले श्री देव रामेश्वर शनिवारी जामडूल बेटावर पोहोचले. गाऊडवाडी-जामडूल-पिरावाडी हा आचरा खाडीपात्रातून होणारा देवस्वारीचा होडी प्रवास अनोखा व डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. हजारो भाविकांची यावेळी गर्दी होती. सर्वधर्मियांच्या सोबतीने साजरा होणारा हा शाही सोहळा खऱ्या अर्थाने आपले वेगळेपण जोपासत आहे.
आचरा गावातील बारा वाड्यांतील रयतेचे दु:ख जाणून घेत निघालेल्या या देवस्वारीचा आजचा तिसरा दिवस होता. संपूर्ण आचरा गाव सजून देव रामेश्वर आपल्या अंगणात येईल याची वाट लोक पहात होते. गुढ्या तोरणे, पताका, रांगोळी सडा यांनी सुशोभीकरण करण्यात आले होते. शनिवारी गाऊडवाडी ब्राह्मणदेव मंदिरातून निघालेली ही स्वारी रयतेला आशीर्वाद देत जामडूल बेटावर पोहोचली. बेटाच्या पलीकडे हजरत पीर इब्राहिम खलील पीर यांचा मान सोहळा करण्यात आला. तर बेटावर जेरोन फर्नांडिस यांनी भाविकांना महाप्रसाद दिला. गाऊडवाडी, हिर्लेवाडी येथे ग्रामस्थांनी भाविकांसाठी केलेला शीतपेय-अल्पोपहार व ठिकठिकाणी देण्यात येणारी प्रसाद सुविधा व पिरवाडी येथे भाविकांना केलेली मोफत होडी सेवा आचरा गावची एकी व सर्वधर्म समभावाचा अनोखा मेळ दर्शवित होती.
सायंकाळी श्री स्वारी बोटीतून पिरावाडी येथे आली. पिरावाडी हिर्लेवाडी बंधारा या पारंपरिक मार्गाने रात्री ब्राह्मणदेव मंदिरात विश्रांतीनंतर पुन्हा नागझरी येथील गिरावळ मंदिरात विश्रांती घेणार आहे. १२ एप्रिल व १३ एप्रिल रोजी श्रींची स्वारी मुक्काम करणार असून, १४ एप्रिल रोजी देवी गिरावळ मंदिरातून ब्राह्मण मंदिर नागोचीवाडी, ब्राह्मण मंदिर पारवाडीमार्गे श्री स्वारींचे रामेश्वर येथे आगमन होणार आहे.