ग्रीन रिफायनरी विरोधात ग्रामस्थांचा एल्गार, गिर्ये-रामेश्वर येथील मेळाव्यात निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 08:44 PM2017-12-09T20:44:59+5:302017-12-09T20:45:10+5:30
गिर्ये-रामेश्वरच्या शाश्वत अस्तित्वासाठी एकत्र येऊन ग्रीन रिफायनरी प्रकल्प हद्दपार केला पाहिजे. कोणत्याही नेत्याच्या मागे न जाता येथील जनतेने स्वत:च नेता बनून काम केले पाहिजे.
देवगड - गिर्ये-रामेश्वरच्या शाश्वत अस्तित्वासाठी एकत्र येऊन ग्रीन रिफायनरी प्रकल्प हद्दपार केला पाहिजे. कोणत्याही नेत्याच्या मागे न जाता येथील जनतेने स्वत:च नेता बनून काम केले पाहिजे. रिफायनरी प्रकल्प हा येथील आंबा कलमांना व माणसांनादेखील घातक ठरणारा आहे. यामुळे अशा प्रकल्पाला कोकणामध्ये आश्रय देता कामा नये. यासाठी येथील जनतेने एकत्रित येत संघर्ष करून औष्णिक ऊर्जा प्रकल्पासारखा हा प्रकल्पही हद्दपार केला पाहिजे, असे मत कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी केले.
गिर्ये-रामेश्वर येथे होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात रामेश्वर मंदिर येथे शनिवारी मेळावा झाला. यावेळी कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम, योगेश नाटेकर, रामेश्वर सरपंच नलिनी गिरकर, जिल्हा परिषद सदस्या वर्षा पवार, रामेश्वर-गिर्ये प्रकल्पविरोधी समितीचे अध्यक्ष सुरेश केळकर, मुनाफ ठाकूर, पंढरीनाथ आंबेरकर, वसंत बांदकर, नंदकुमार कुलकर्णी, अमित भाटकर, राजेंद्र कातारकर, विक्रांत कर्णिक, भाई सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अशोक वालम म्हणाले की, या प्रकल्पाच्या विरोधात संघर्ष करताना कोणालाही घाबरुन आपण घरी बसता कामा नये. राजकीय नेते व या प्रकल्पामध्ये स्वार्थ साधून आपली आर्थिक उन्नती साधणारे नेते हे हा प्रकल्प होण्यासाठी खोटे बोलून तुमची दिशाभूल करतील. या त्यांच्या आश्वासनाला तुम्ही बळी पडू नका. संघर्ष करण्यासाठी तुमच्यासोबत मी आहे. आपला प्राण गेला तरी चालेल, पण या ठिकाणी कोकणच्या सौंदर्याला बाधक ठरणारा प्रकल्प उभारला जाता कामा नये, असे ते म्हणाले.
शासनकर्त्यांचे प्रकल्प लादण्याचे काम
यावेळी विक्रांत कर्णिक म्हणाले की, शासन असे पर्यावरणाचे ºहास करणारे प्रकल्प उभारीत असताना या प्रकल्पाची परिपूर्ण माहिती कधीही शेतकºयांना देत नाही. येथील भू धारकांना अंधारात ठेवूनच प्रकल्प लादण्याचे काम शासनाने वेळोवेळी केले आहे. यामुळे आपण संघटित राहून असे प्रकल्प होऊ देता कामा नये, असेही ते म्हणाले.
आमिषाला बळी पडू नका
वडिलोपार्जित असलेली आपली या ठिकाणची जमीन, या ठिकाणची देवस्थाने सोडून आपण कोठेही जाऊ शकत नाही. आपली या मातीशी नाळ जोडलेली आहे. या कोकणच्या मातीने आपणाला आर्थिक बळ दिले आहे. या जन्मभूमीला आपण विसरु शकत नाही अशी भावना आपल्या मनामध्ये ज्वलंत असली पाहिजे. येथील एजंट हे आपणाला पैसे मिळण्यासाठी तुमच्या जमिनी विकण्यासाठी प्रवृत्त करतील. पण त्यांच्या या आमिषाला बळी पडता कामा नये, असे मतही वालम यांनी व्यक्त केले.