गव्यांकडून बागा उद्ध्वस्त
By admin | Published: December 16, 2015 11:49 PM2015-12-16T23:49:38+5:302015-12-17T01:26:20+5:30
आवाडेतील शेतकरी हवालदिल : वनविभागाचे दुर्लक्ष, भरपाई देण्याची मागणी
कसई दोडामार्ग : सहा गव्यांच्या कळपाने आवाडे-वेळपईवाडी येथील तीन शेतकऱ्यांची सुमारे ७०० केळीची रोपे मंगळवारी रात्री उद्ध्वस्त केली. वनविभागाने आमच्या बागायती ताब्यात घेऊन आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बागायतदार नंदकिशोर दळवी, गुरूनाथ दळवी, संजय दळवी यांनी केली आहे.
वेळपईवाडीत गव्यांचा वावर वाढला असून सहा गवे या परिसरात वास्तव्यास असल्याचे समजते. वेळपईवाडीत नंदकिशोर दळवी, गुरूनाथ दळवी, संजय दळवी यांनी सुमारे १५०० केळींची लागवड केली आहे. केळीच्या रोपांना तीन महिने झाले आहेत. बागायतीत गव्यांचा वावर वाढत असल्याने अॅटमबॉम्ब, फटाक्यांचा आवाज करून हुसकावून लावण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. याबाबत वनविभागालाही कळविण्यात आले आहे.
वनविभागाचे कर्मचारी कायद्याच्या चौकटीत राहून तुटपुंजा पंचनामा करत आहेत. यामुळे शेतकरी भरडला जात आहे. शासन नियमानुसार पीक मुळासहीत उन्मळून टाकली, तरच त्या पिकांचा पंचनामा केला जातो. कायद्याच्या नियमाप्रमाणे वनकर्मचारी पंचनामे करीत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
मंगळवारी रात्री सहा गव्यांच्या कळपाने वेळपईवाडीतील केळी, बागायतीत घुसखोरी केली. नंदकिशोर, गुरूनाथ, संजय यांच्या बागायतीतील केळी गव्यांनी पूर्ण फस्त केल्या. वनविभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून द्यावी. शिवाय उर्वरित बागायतीच्या संरक्षणासाठी गव्यांचा बंदोबस्त करावा. अन्यथा दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी २६ जानेवारी रोजी वनविभाग कार्यालयासमोर आंदोलन उपोषण करण्याचा इशारा दोडामार्ग तालुका शेतकरी संघटनेने दिला आहे. (वार्ताहर)
न्याय द्या : नंदकिशोर दळवी
गवा रेड्यांनी किंवा अन्य वन्य प्राण्यांनी पूर्ण ओरबाडून खालेले पीक जगणे कठीण आहे. वस्तूनिष्ठ परिस्थिती पाहून वन्यप्राण्यांकडून खाल्ले गेलेले पीक जिवंत राहील काय, त्या पिकापासून फळधारणा होईल काय, याचा विचार करून अशा रोपांचा पंचनामा करावा. शिवाय त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी खास बाब म्हणून या प्रश्नावर आवाज उठवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी नंदकिशोर दळवी यांनी केली आहे.