ओखी चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची सुरुवात, समुद्राला उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:19 PM2017-12-05T12:19:48+5:302017-12-05T12:31:46+5:30
ओखी चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्ट्यांवरील भागातील मच्छिमारी बोटी भरकटल्या आहेत. पावसानेही पहाटेपासून सुरुवात केल्याने वातावरणात मोठा बदल जाणवत आहे. ओखी चक्रीवादळामुळे मंगळवारी सिंधुदर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.
सिंधुदुर्गनगरी, दि. ४ : ओखी चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्ट्यांवरील भागातील मच्छिमारी बोटी भरकटल्या आहेत. पावसानेही पहाटेपासून सुरुवात केल्याने वातावरणात मोठा बदल जाणवत आहे.
वेंगुर्लेत बंदरावर नांगरून ठेवलेल्या ७ फायबर होड्या सोमवारी रात्री समुद्रात बुडाल्या आहेत. सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तहसीलदार गोसावी यांच्याकडून पाहणी करण्यात आली असून पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.
ओखी चक्रीवादळामुळे मंगळवारी सिंधुदर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. पहाटेच्या वातावरणातील बदलांमुळे आंबोलीपासून बांद्यापर्यंत ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली.
वादळामुळे जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण होते. मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास सर्वत्र झालेल्या अवकाळी पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. बुधवारीही जिल्ह्यात वातावरण ढगाळ राहील; शिवाय पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.
समुद्राला उधाण, किनाऱ्याला मोठा तडाखा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ओखी वादळाचा परिणाम पाहायला मिळत आहे. मालवण, वेंगुर्ले, देवगड समुद्र किनाऱ्याला मोठा तडाखा बसला आहे. कोचरा-देवबागला समुद्राचं पाणी वस्तीत घुसले. किनाऱ्यावरील मच्छीमार आणि स्थानिक रहिवशांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
मालवण तालुक्यातील आचरा, मेढा, दांडी, किनारपट्टीलाही समुद्राच्या उधाणाचा तडाखा बसला आहे. पिरावाडी गावाशी संपर्क तुटला आहे तर देवबागमध्ये कुलेर्वाडीत पाणी घुसलं आहे. दरम्यान, किनाऱ्यावरील मच्छिमार बांधव व ग्रामस्थ भीतीच्या छायेत वावरत आहेत. देवबाग मोंडकरवाडी येथे समुद्राच्या उधाणाचे पाणी घुसले आहे.
किल्ले दर्शनासह अन्य जलक्रीडा प्रकार आणखी दोन दिवस बंद राहणार आहेत. वादळसदृश परिस्थिती आणखी दोन दिवस अशीच राहणार असल्याने बंदर विभागाच्यावतीने तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे, अशी माहिती बंदर विभागाकडून देण्यात आली.