चुकीचा सल्ला देणाऱ्यांमुळेच पर्ससीन बंदीमोहम्मद खान
By admin | Published: April 5, 2016 11:14 PM2016-04-05T23:14:36+5:302016-04-06T00:17:17+5:30
: राज्य शासनाच्या निर्णयात बदल होणे आवश्यक
रत्नागिरी : जानेवारी ते मे महिन्यापर्यंत ‘पर्ससीन नेट’ने मच्छीमारी करण्यास बंदी घालण्याचा राज्य शासनाचा निर्णय हा चुकीचा सल्ला देणाऱ्यांमुळे घेतला गेला आहे. त्यामुळे मच्छीमार व या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या सर्वच घटकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या निर्णयात योग्य बदल होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान यांनी आज (मंगळवार) पत्रकारपरिषदेत बोलताना केले.
पर्ससीन नेटने जानेवारी ते मे महिन्यापर्यंत मच्छीमारीला बंदी घालण्याच्या निर्णयाने मच्छीमारांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे या समस्येतून मार्ग काढण्यासाठी आपण मंत्री एकनाथ खडसे यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच आज (मंगळवारी) दुपारी रत्नागिरी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याशीही चर्चा केली आहे. त्यामुळे यातून आपण लवकरच समाधानकारक मार्ग काढूया, असे त्यांनी सांगितल्याचेही खान म्हणाले.
स्वातंत्र्यानंतरही शिक्षण व आर्थिक बाबतीत अल्पसंख्याक अद्याप मागासलेलेच आहेत. त्यांची आर्थिक स्थिती सुधारलेली नाही. राजेंद्र सच्चर आयोगाच्या अहवालातही हाच मुद्दा मांडलेला आहे. विशेषत: मुस्लिम समाज आर्थिक बाबतीत खूपच पिछाडीवर आहे. मात्र, फडणवीस सरकारकडून अल्पसंख्याकांची ही आर्थिक कोंडी फोडण्याचे, शैक्षणिक मागासलेपण दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी नवीन योजना सुरू होत आहेत. मच्छीमारांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचाही प्रयत्न सुरू आहे. (प्रतिनिधी)
तंत्रनिकेतन, मुलींचे वसतिगृह मंजूर
राज्य सरकारच्या नवीन योजनांनुसार प्रत्येक जिल्ह्यात मुस्लिमबहुल भागात आयटीआय व शासकीय तंत्रनिकेतन उभारून त्यात अल्पसंख्याकांना आरक्षण देण्याचा निर्णय झाला आहे. त्याअंतर्गत मालेगाव, परभणी, जळगाव, जालना, मुंबई व रत्नागिरीसह राज्यातील ११ ठिकाणी तंत्रनिकेतन व आयटीआयला मंजुरी देण्यात आली आहे. रत्नागिरीसाठी मुलींचे एक वसतिगृह मंजूर झाले आहे, असे े ते म्हणाले.
‘भारत माता की जय’ चे राजकारण नको
भारत माता की जय’ म्हणणाऱ्यांना म्हणू द्यावे. मात्र, कोणावर लादण्याचा हा विषय नाही. भारताला माता म्हणणे न म्हणणे हा वेगळा मुद्दा आहे. ‘भारत माता की जय’ म्हणण्यात काहीही चुकीचे नाही. आपणा सर्वांना देशाचा आदर असलाच पाहिजे. त्यामुळे या विषयावरून एवढे राजकारण करण्याची गरज नाही, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ‘भारत माता की जय’ असे विधानसभेत म्हटले, याबाबत ते बोलत होते.