सत्ताधाऱ्यांकडूनही मच्छिमारांचा विश्वासघात : परशुराम उपरकर
By admin | Published: November 8, 2015 11:15 PM2015-11-08T23:15:08+5:302015-11-08T23:36:46+5:30
पारंपरिक आणि पर्ससीननेट मच्छिमारांच्या वादात पालकमंत्र्यांनी लक्ष घातले नाही.
कणकवली : मच्छिमारांच्या प्रश्नाबाबत कोणी कोणाला पळवून लावले व कोणाला जवळ केले, हे मच्छिमारांना ठाऊक आहे. गेल्या पंधरा वर्षांत माजी पालकमंत्री नारायण राणे यांनी मच्छिमारांना झुलवत ठेवले. तर खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनीही मच्छिमारांचा विश्वासघात केला आहे, अशी टीका मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी येथील पत्रकार परिषदेत केली. शिवसेना-भाजपातील अंतर्गत वादात मच्छिमारांचा प्रश्न चिघळला असल्याचेही उपरकर म्हणाले.
आमदार वैभव नाईक हे पारंपरिक मच्छिमारांच्या बाजूने असल्याचे सांगत आहेत. गेल्या महिन्यात समुद्रातील मच्छिमारांच्या उपोषणावेळी नाईक यांनी मत्स्योद्योगमंत्री एकनाथ खडसे यांना सिंधुदुर्गात आणणार असल्याचे सांगितले होते. हे आश्वासन फोल ठरले आहे. वर्षभर हा मच्छिमारांचा प्रश्न जवळून पाहणाऱ्या आमदार नाईक यांनी हा प्रश्न का सोडवला नाही? असा सवाल उपरकर यांनी केला.पारंपरिक आणि पर्ससीननेट मच्छिमारांच्या वादात पालकमंत्र्यांनी लक्ष घातले नाही. हिंसक आंदोलने होऊनही पालकमंत्री मच्छिमारांची भेट घेण्यासाठीही आले नाहीत. त्यांचे आणि आमदार नाईक यांचे सूर अद्याप जुळलेले नाहीत. पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील वेंगुर्ल्यात बहुतांश पर्ससीननेट मच्छिमार आहेत. पालकमंत्र्यांना पालकत्वाचे महत्त्वच नाही.
उपरकर म्हणाले की, आमदार नाईक यांनी मंत्र्यांना जिल्ह्यात आणण्यापेक्षा अभ्यास करून अधिवेशनात हा प्रश्न मांडावा. हा प्रश्न सर्वाेच्च आणि उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. महाराष्ट्र शासनाने याप्रश्नी वकील देऊन शासनाची भूमिका मांडण्याची गरज आहे. याकडे दुर्लक्ष होत आहे. आम्हाला मालवणवासीयांनी निवडून दिलेले नसतानाही आम्ही सातत्याने मच्छिमारांचा प्रश्न अभ्यासपूर्ण मांडला. मात्र, आमदार नाईक यात का कमी पडत आहेत. आम्ही या प्रश्नी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली असून प्रसंगी न्यायालयात जाऊ, असे परशुराम उपरकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)