देवगड-जामसंडे नगरपंचायतीचा मार्ग मोकळा
By admin | Published: February 4, 2016 01:28 AM2016-02-04T01:28:59+5:302016-02-04T01:28:59+5:30
प्रस्ताव लालफितीतून बाहेर : अंतिम अधिसूचना येत्या पंधरा दिवसांत
सिंधुदुर्गनगरी : गेली दहा वर्षे शासन दरबारी लालफितीत अडकलेल्या देवगड-जामसंडे नगरपंचायत स्थापनेच्या हालचालींना मंत्रालयीन पातळीवरून गती मिळाली असून, या नगरपंचायतीची अंतिम अधिसूचना येत्या १५ दिवसांत जारी होण्याची शक्यता असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी बुधवारी सांगितले. सध्या नगरपंचायत स्थापनेचा हा प्रस्ताव मंजुरीसाठी न्याय व विधी आयोगाकडे आहे. त्या ठिकाणी मंजुरी मिळताच तो अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
कणकवली विधानसभा मतदारसंघातील देवगड हे तालुक्याचे ठिकाण व त्या लगतची जामसंडे ग्रामपंचायत यांचे एकत्रीकरण करून नगरपंचायत स्थापावी, अशी मागणी २००५ पासूनची आहे. या दोन्ही ग्रामपंचायतींची लोकसंख्या सुमारे १७ ते १८ हजारांच्या घरात असून, या ठिकाणी नगरपंचायत स्थापन झाली, तर अनेक विकासकामे मार्गी लागणार आहेत. त्यामुळे ही नगरपंचायत स्थापन करावी, अशी मागणी अनेक राज्यकर्त्यांनी नगरविकास खात्याकडे केली होती. कणकवली नगरपंचायतीनंतर देवगड नगरपंचायतीची स्थापना होईल, अशी आशा होती मात्र, लालफितीत अडकल्याने ही नगरपंचायत अद्याप स्थापन झालेली नाही. (प्रतिनिधी