सावंतवाडी शहराला अवैद्य धंद्यांचा विळखा

By Admin | Published: June 7, 2016 11:52 PM2016-06-07T23:52:47+5:302016-06-08T00:09:56+5:30

मटका, जुगारासह फिरत्या मद्यालयाने शहराला वेढले : शंकर पाटील यांच्यासमोर आव्हान; पालकमंत्र्यांच्या सकारात्मकतेची गरज

Find out the illegal trade in the city of Sawantwadi | सावंतवाडी शहराला अवैद्य धंद्यांचा विळखा

सावंतवाडी शहराला अवैद्य धंद्यांचा विळखा

googlenewsNext

राजन वर्धन --सावंतवाडी  शंकर पाटील हे नवे पोलिस अधिकारी चार दिवसांपूर्वीच रूजू झाले आहेत. अधिकारी बदलले की, कार्यालयीन कामकाजाची पद्धतीही बदलत असते. अशा नव्या अधिकाऱ्यांकडून जनतेलाही साहजिकच चांगल्या कामाची अपेक्षा असते. सध्या सावंतवाडीनगरीला अवैध धंद्यांचा विळखा आवळत असून बदलून आलेल्या अधिकाऱ्यांशी मैत्री निर्माण करून आपले वजन वाढवू पाहणाऱ्यांनीही शहरातील अशा अवैध धंद्यांना पाठबळ दिले आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांना हे आव्हान बनले असून, पालकमंत्र्यांचे निवासस्थान असणाऱ्या सावंतवाडीला स्वच्छ करण्याची संधी चालून आली आहे.
देशाच्या बाजारपेठेत लाकडी खेळण्यांच्या कलाकुसरीने जशी ओळख आहे, तशीच ओळख कोकण क्षेत्रासह राज्यातील निसर्गरम्य व आल्हाददायक नगरी म्हणूनही सावंतवाडीची ओळख आहे. साहित्य, संस्कृती व शिक्षण क्षेत्रातही हा ऐतिहासिक वसा कायमच टिकवून ठेवत इथल्या नागरिकांनी आपलेपणाच्या वागणुकीने हीन व कृतघ्न राजकारणापासून आपल्या नगरीला दूर ठेवले आहे. राज्यातील रसातळाला पोहोचलेल्या राजकारणालाही बगल देत केवळ मतदानापुरते राजकारणाला महत्त्व देत सर्वांशी सलोख्याचे संबंध कायम ठेवल्याने या नगरीच्या सर्वांगीण विकासाला अविरत चालना मिळाली आहे. सध्या शहरात मटका व्यवसायाने धुमाकूळ घातला आहे. बसस्थानक, मुख्य चौक, बाजारपेठेसह सालईवाडा, माठेवाडा, बाहेरचावाडा, उभाबाजार, माठेवाडा, भाजीमार्केट, खासकीलवाडा अशा अनेकठिकाणी पानपट्टीच्या नावाखाली पान टपऱ्या उभारून मटका चालवला जात आहे. पण याहून गंभीर म्हणजे नगरपालिकेच्या भोवती अशा टपऱ्यांनी आपले जाळे घट्ट विणण्यासही सुरूवात केली आहे. तर याहूनही गंभीर म्हणजे शाळा, महाविद्यालयांच्या सभोवतालीही मटक्याच्या टपऱ्यांचा विळखा आवळत चालला आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांच्या लोकांच्या घामाच्या पैशावर केवळ आमिषाने राजरोस डल्ला मारला जात आहे.
शहरातील मटका व्यवसायाला दुर्लक्षित केल्याने मटक्याबरोबरच आता जुगार अड्डेही शहर व परिसरात जोर धरत आहेत. कारवाईअभावी ते तसेच सुरू आहेत. परिणामी या मार्गावरून ये-जा करणाऱ्या महिलांसह विद्यार्थ्यांना याचा त्रास होत असतो. त्यामुळे अशा अड्ड्यांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. मागील काही दिवसांत कारवाई करण्याचा प्रकार अनुभवास आला पण न्यायालयीन कक्षेत या कारवाया केवळ नाममात्र आणि कागदोपत्री ठरल्या. अजूनपर्यंत अशा अवैध धंदे करणाऱ्या एकालाही कडक किंवा अद्दल घडविणारी शिक्षा न झाल्याने पोलिस प्रशासनाचे अप्रत्यक्ष पाठबळच या अवैध धंद्यांना मिळत गेले आहे. शिवाय अशा अवैध धंदेवाईकांकडून पोलिसांची बदनामी करण्याची अखंडित परंपराही सावंतवाडी पोलिस स्थानकाला काही नवीन नाही. त्यामुळे अशा बदनामीपासून पोलिस स्थानकाची प्रतिमा उजळविण्याची जबाबदारी जशी शंकर पाटील यांना पेलावी लागणार आहे, तशीच नगरातील अशा अवैध धंद्यांना चाप बसविण्याची धमकही दाखवावी लागणार आहे. त्यांच्या साथीला मोठे पाठबळ पालकमंत्र्यांचेही राहणार आहे. कारण आगामी काळातील नगरपालिका निवडणुकीत मतदारांसमोर स्वच्छ चेहरा घेऊन जाताना पालिकेला याचा मोठा लाभ होणार आहे.


जुगार चित्रफिती : उपोषण आणि पोलिसांची कोंडी
शहरात विविध ठिकाणी फिरता दारू विक्रीचा व्यवसाय होत आहे. शहरात मागवेल त्या ठिकाणी दारू पोहोच केली जात आहे. यामध्ये गोवा बनावटीच्या दारूचा मोठ्या प्रमाणात साठा या फिरत्या मद्यालयात असतो. आजपर्यंत हे मद्यालय विनाकारवाईचेच राहिले आहे. शहर परिसरातील एका जुगार अड्ड्याची चित्रफित काँग्रेसने पोलिसांना दाखविली होती. पण त्याच्या कारवाईबाबत मात्र पाठपुरावा केला नव्हता. त्यामुळे पुरावा असूनही काहीच कारवाई झाली नाही. तर अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिस ठाण्यासमोर भाजपाने उपोषण केले होते. पण यामध्येही काहीच हाती न मिळविता उपोषणाचा गाशा गुंडाळण्यात आला. अशा प्रकारांमध्ये पोलिसांची दोन्ही बाजूंनी कोंडी झाली होती.

नागरिकांना केसरकरांकडून अपेक्षा
नगरपालिका निवडणुकीचे वारे सावंतवाडी शहरात वाहू लागले आहे. सत्ताधाऱ्यांचा कारभार समाधानकारक असला, तरी त्यांचे कर्तेकरविते पालकमंत्री दीपक केसरकरच आहेत. त्यामुळे अवैध धंद्यांच्या बंदीसाठी पालकमंत्र्यांनी पाठबळ देण्याची मागणी शहरवासियांतून व्यक्त होत आहे. पालकमंत्र्यांनी हे पाठबळ दिले, तर शहर स्वच्छ होईलच, पण आगामी निवडणूकही त्यांना सुलभ होईल.

Web Title: Find out the illegal trade in the city of Sawantwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.