खाऊचे पैसे दुष्काळग्रस्तांसाठी
By admin | Published: October 7, 2015 11:49 PM2015-10-07T23:49:25+5:302015-10-08T00:33:16+5:30
अभिनव उपक्रम : कुणकेरी शाळेतील विद्यार्थ्यांचा मदतीचा हात
सावंतवाडी : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना जिल्हा परिषद शाळा कुणकेरी नं. १ मधील ४३ मुलांनी आपल्या घरातील बचत बँक म्हणजेच आपल्या खाऊच्या पैशातून ११ हजार ५०० रूपये देणगी स्वरूपात मदत प्रभारी तहसीलदार भास्कर जाधव यांच्याकडे सुपूर्द केली.‘आमचा महाराष्ट्र आमचा शेतकरी’ हा संवेदनशीलता मूल्यावर आधारीत शैक्षणिक उपक्रम जिल्हा परिषद शाळा नं. १ कुणकेरीमध्ये घेण्यात आला. यावेळी पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत, गटशिक्षणाधिकारी शिवाजी देसाई, केंद्रप्रमुख म. ल. देसाई, सरपंच मनाली परब, उपसरपंच कृष्णा मेस्त्री, गणेश परब, राजन सावंत, तलाठी, वन अधिकारी, पालकवर्ग बहूसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्वी सावंत, स्वागत पूजा सावंत, प्रस्ताविक गीता बरागडे, उपक्रमसूची सानिका सावंत आणि सिद्धी परब या छोट्या मुलांनी करून मान्यवरांकडून शाबासकी मिळविली. शाळेचे राज्य पुरस्कार प्राप्त विठ्ठल कदम, अध्यापक रश्मी वाडकर, बाबली चिळे, लीना सावंत, अस्मीता कादार या सर्वांच्या कल्पकतेतून व सहकार्यातून हा उपक्रम यशस्वी झाला. (वार्ताहर)
प्रमोद सावंत : राज्यात आदर्श ठरेल
यावेळी सभापती प्रमोद सावंत म्हणाले की, आपल्या शाळेचा आपणास अभिमान वाटतो आहे. पालकांनी हे कार्य असेच पुढे न्यावे, ज्यामुळे आपल्या गावाचा मोठा नावलौकीक होईल. प्रभारी तहसीलदार जाधव म्हणाले, शाळेतील मुलांनी आपल्या खाऊचे पैसे संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना देणे म्हणजेच या शाळेच्या विचारी व संस्कारी शिक्षणाची शिदोरी निदर्शित करणारी आहे. महाराष्ट्रातील हा यंदाचा पहिलाच उपक्रम असून राज्यात हा उपक्र म आदर्श निर्माण करेल, असे मत मांडले.