प्राचीन कोरीव शिल्प आढळले, बघ्यांनी केली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 10:35 PM2017-12-26T22:35:54+5:302017-12-27T11:14:10+5:30
मालवण तालुक्यातील आचरा टेंबली येथे एका घराच्या बांधकामासाठी खोदकाम करताना चौकोनी आकाराच्या दगडावर कोरलेले रेखीव शिल्प सापडले आहे
आचरा : मालवण तालुक्यातील आचरा टेंबली येथे एका घराच्या बांधकामासाठी खोदकाम करताना चौकोनी आकाराच्या दगडावर कोरलेले रेखीव शिल्प सापडले आहे. हे शिल्प सापडल्याची चर्चा आचरा परिसरात सोशल मीडियावर रंगली होती. त्यानंतर ते पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली.
आचरा टेंबली येथे एका घराच्या बांधकामासाठी जागेचे सपाटीकरण करताना खडकाळ भाग खोदून माती व दगड बाजूला टाकताना हे कोरीव शिल्प सापडले आहे. चौकोनी आकाराच्या दगडावर दोन स्त्रिया पिंडी घेऊन बसल्याचे चित्र कोरण्यात आले आहे. खोदलेली माती जेसीबीच्या सहाय्याने बाजूला टाकताना मातीत ठेकेदाराला चौकोनी आकाराचा दगड सापडला होता.
सपाटीकरण करताना काढलेली माती जेसीबीच्या सहाय्याने बाजूला टाकली जात होती. त्यावेळी त्या मातीत चौकोनी आकाराचा दगड ठेकेदारास दिसून आला असता कुतूहलापोटी ठेकेदाराने तो दगड बाजूला काढून घेत मातीने भरलेला तो दगड साफ करण्यास सुरुवात केली असता त्यावर कोरीव काम केले असल्याचे आढळून आले. शिल्प मिळाल्याची बातमी आचरा परिसरात सोशल मीडियावर पसरली होती. त्यामुळे शिल्प बघण्यासाठी लोक धाव घेत होते.
सतीगळ असण्याची शक्यता
हा एक वेगळ्या प्रकारचा सतीगळ (सती दगड) असण्याची शक्यता आहे. युद्धात हौतात्म्य पत्करलेल्या वीराच्या स्मरणार्थ वीरगळ उभारण्याची प्रथा होती. तशीच प्रथा वीराची पत्नी सती गेल्यावर तिच्या स्मरणार्थ सतीगळ उभारण्याची होती. गळ हा शब्द कन्नडमधील कल्ल (दगड) या शब्दाचा अपभ्रंश होऊन आला आहे. सामान्यत: सतीगळाच्या शिल्पामध्ये स्त्रीचा हात आशिर्वादाच्या स्थितीत कंकणादि सौभाग्य अलंकारांसह असतो. तथापि या शिल्पात तो दिसत नाही. मात्र दोन स्त्रिया शंकराची अर्चा करताना दिसत असून त्याचा अर्थ त्या शिवरुप होऊन कैलासवासी झाल्या आहेत व त्यांना मोक्ष मिळाला आहे, असा होतो. या ठिकाणी दोन स्त्रिया सती गेल्या असाव्यात. शिल्पाच्या वर कलश स्पष्ट दिसतो आहे. कलशाच्या डाव्या उजव्या बाजुला चंद्र-सुर्याच्या प्रतिमा असतात. परंतु या शिल्पात झीज झाल्यामुळे त्या दिसत नसाव्यात. शिल्पाचा दगड ‘सँडस्टोन’ प्रकारातील आहे, असे छायाचित्रावरुन दिसते. हा दगड कर्नाटकात मोठ्या प्रमाणात सापडतो. शिल्पाच्या कारागिरीवरुन ते उत्तर मध्ययुगीन (इ.स.चे १२ वे ते १५ वे शतक) किंवा त्याही अलीकडील असण्याची शक्यता आहे.
सतीश लळीत
शिल्प अभ्यासक, माहिती उपसंचालक, कोल्हापूर
२६१२२०१७ - केएएनके - १०
आचरा टेंबली येथे खोदकाम करताना चौकोनी आकाराच्या दगडावर कोरलेले रेखीव शिल्प सापडले आहे.