सावंतवाडीत चार बंद फ्लॅट फोडले
By admin | Published: May 4, 2015 12:31 AM2015-05-04T00:31:03+5:302015-05-04T00:35:32+5:30
चोरीचे सत्र सुरूच : अद्याप तक्रार नाही; पोलिसांचा तपास सुरू
सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील राजरत्न निवासी संकुलातील चार बंद फ्लॅट अज्ञात व्यक्तींनी फोडले. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. सिंधुदुर्गमध्ये चोरीचे सत्र थांबता थांबेना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. चोरीबाबत सावंतवाडी पोलिसांत तक्रार नसली, तरी पोलिसांनी प्रथम दर्शनी जाऊन पाहणी केली.
सावंतवाडी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राजरत्न कॉम्प्लेक्समध्ये शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घुसून बंद फ्लॅट फोडले. यात योगेश देसाई तसेच जनार्दन देरे यांच्या फ्लॅटचा समावेश आहे, तर अन्य दोन फ्लॅटधारकांशी पोलिसांचा संपर्क झाला नाही. चारही फ्लॅटच्या दरवाज्यांच्या कड्या चोरट्यांनी काढून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, आतील काही सामान गेले काय, याची माहिती मिळू शकली नाही. चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी राजरत्न कॉम्प्लेक्समध्ये जाऊन पाहणी केली. मात्र, बंद फ्लॅटचे मालकही बाहेर गावी असल्याने नेमक्या काय वस्तू चोरीला गेल्या याची माहिती पोलिसांना मिळाली नाही. या कॉम्प्लेक्समध्ये एक पोलीस अधिकारी राहतात. त्यांनी इमारतीतील प्रमुख व्यक्तींना भेटून लवकरात लवकर सुरक्षा रक्षक तसेच सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यास सांगितले आहे. उशिरापर्यंत तक्रार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघांचे अर्ज आल्याचे आहेत, असे शेलार यांनी स्पष्ट केले.