सोनवडे मार्ग ‘कोल्हापूर’कडे वर्ग करण्याचा घाट
By admin | Published: May 20, 2016 11:10 PM2016-05-20T23:10:08+5:302016-05-20T23:37:19+5:30
मंत्र्यांच्या पत्रानंतर कार्यवाही सुरू : सिंधुदुर्ग विभागाला पत्रव्यवहार प्राप्त
मिलिंद पारकर -- कणकवली--सोनवडे घाटमार्गाचा सिंधुदुर्ग जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडील भाग काढून कोल्हापूर विभागाकडे वर्ग करण्याचा घाट घालण्यात आला आहे. खुद्द बांधकाम मंत्र्यांकडून आलेल्या पत्रानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून तसे पत्र सिंधुदुर्ग विभागाला प्राप्त झाले आहे. गेल्या २० वर्षांपासून सिंधुदुर्ग विभागाकडून हा घाटमार्ग होण्यासाठी प्रयत्न झाले. आता हे काम मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असताना कोल्हापूर बांधकाम विभागाकडे देण्याच्या हालचाली सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कुडाळ तालुक्यातील सोनवडे ते कोल्हापूर हा मार्ग कोल्हापूर जिल्ह्याला जोडण्यासाठी पर्यायी मार्ग ठरणार असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोहोचण्यासाठीचे अंतर काही किलोमीटरने कमी होणार आहे. यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे सहा किलोमीटरचा मार्ग हा वन विभागाच्या अखत्यारित येतो. सुरुवातीला पर्यायी जमिनीचा प्रश्न आणि नंतर वन्य प्राण्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून सोनवडे-कोल्हापूर मार्ग वन विभागाच्या अडथळ्यामुळे बराच कालावधी मंजुरीच्या प्रतीक्षेत अडकला होता. वन जमिनीसाठी पर्यायी जमीन आणि त्या जमिनीवर लागवड करण्यासाठीचा निधी यापूर्वी वन विभागाला देण्यात आला आहे.
राधानगरी अभयारण्यापासून दहा किलोमीटर अंतराच्या आत या मार्गाचा आराखडा येत असल्याने वन विभागाच्यापरवानगीबाबतचे प्रश्न निर्माण झाले. या मार्गाचा कोल्हापूर विभागाकडे ३.८० किलोमीटर, तर सिंधुदुर्ग विभागाकडे ५.७५ किलोमीटर भाग येतो. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १९९८ सालापासून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर राज्याच्या वन विभागाकडून मार्गासाठी मंजुरी मिळाली. वन्य प्राण्यांना जाण्यासाठी काही ठिकाणी ओव्हरब्रीज आणि काही ठिकाणी अंडरपास ठेवण्याचा पर्याय त्यासाठी सुचविण्यात आला आहे. रस्ता कसा जाणार याच्या आखणीला बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता मुंबई यांच्या कार्यालयाकडून यापूर्वीच मंजुरीही मिळाली होती. राज्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर आता केंद्र शासनाची मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र, याचवेळी सिंधुदुर्गातील मार्ग कोल्हापूरकडे देण्याचा घाट घालण्यात आला आहे. सोनवडे घाटमार्गावर वन्य प्राण्यांना रस्ता ओलांडण्यासाठी जे ओव्हरब्रीज आणि अंडरपास ठेवण्यात येणार आहेत, ते नेमके कोणत्या ठिकाणी असावेत, यासाठी ‘डब्ल्यू.आय.आय.एफ.’ या संस्थेचे प्रतिनिधी घाटमार्गाचा सर्व्हे करणार आहेत. त्यानंतर या जागा निश्चित होतील. (प्रतिनिधी)
नव्याने आखणीसाठी तीन कोटी
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोल्हापूर विभागाकडून सोनवडे घाटमार्गाची नव्याने आखणी व भूसंपादन करण्यासाठी तीन कोटींचे काम मंजूर करून घेण्यात आले आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग विभागाने केलेली मार्गाची आखणी चुकीची ठरविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
तक्रार कोणाकडे करायची?
घाटमार्ग कोल्हापूर विभागाकडे हस्तांतरित झाला तर रस्ता बांधकाम होताना जर कोणती समस्या उद्भवली, उदाहरणार्थ माती जाऊन अथवा पाण्यामुळे शेतीचे नुकसान झाले, तर तक्रार करण्यासाठी कोल्हापूर गाठायचे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.