मनोरूग्ण महिलांना हक्काचे घर!
By admin | Published: October 15, 2015 09:16 PM2015-10-15T21:16:12+5:302015-10-16T00:08:48+5:30
न्यायालयाचे आदेश : पंधरा वर्षांनंतर ओलांडणार घराचा उंबरठा
रत्नागिरी : प्रादेशिक मनोरूग्णालयात गेली १५ वर्षे दाखल असलेल्या दोन भगिनीना त्यांच्या हक्काचे घर मिळाले आहे. या दोन भगिनींना घरी नेण्यासाठी न्यायालयाने आदेश बजावल्यामुळे त्यांचे नातेवाईक बुधवारी रत्नागिरीत दाखल झाले आहेत. दोघीही घरी जाण्यासाठी अधीर झाल्या होत्या.मनोरूग्णालयात दाखल केल्यावर त्यांना पुन्हा घरी नेण्याची मानसिकता असतेच असे नाही. मात्र, न्यायालयाच्या निर्णयामुळे या दोन भगिनींना आपल्या घरी जाण्याची संधी मिळणार आहे. पुष्पलता गायकवाड (कोल्हापूर) या २०११ साली प्रादेशिक मनोरूग्णालयात दाखल झाल्या होत्या. मात्र उपचाराअंती त्या बऱ्या झाल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे नाव, गावाचे नाव विचारण्यात आले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला. गायकवाड यांचे वडील त्यांना घरी नेण्यासाठी मनोरूग्णालयात बुधवारी दाखल झाले होते.राणी दबडे (बत्तीसशिराळा) नामक मनोरूग्ण महिला २००० साली मनोरूग्णालयात दाखल झाली होती. ही महिलाही बरी झाल्यानंतर तिच्या गावी संपर्क साधण्यात आला. त्यावेळी घर बंद असून, भाऊ मुंबईला राहात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तलाठ्याशी संपर्क साधून तिच्या घराचा सातबारा व माहिती मिळवण्यात आली. त्यावेळी दोन्ही भाऊ जवळच राहत असल्याची माहिती मिळाली. कायद्यानुसार राणीचे हक्क अबाधित असून, तिला घरी घेऊन जाण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानुसार तिचा भाऊ घरी नेण्यासाठी मनोरूग्णालयात दाखल झाला होता.
प्रादेशिक मनोरूग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. पराग पाथरे, मनोविकारतज्ज्ञ डॉ. अतुल ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारीवर्ग मनोरूग्णांवर उपचार करीत असतात. बऱ्या झालेल्या मनोरूग्णांना त्यांच्या हक्काच्या घरी पाठवण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यासाठी नितीन शिवदे, वीणा गणवीर यांचेही सहकार्य लाभते. पोलिसांमार्फत या मंडळींच्या घरी संपर्क साधला जातो. सध्या मनोरूग्णालयात ११४ पुरूष व ७९ महिला मनोरूग्ण उपचार घेत आहेत. त्यामध्ये वयस्करांची संख्या लक्षणीय आहे. संबंधित मंडळी बरी झाली तरी नातेवाईक स्वीकारण्यासाठी तयार नसल्यामुळे त्यांना मनोरूणालयाचाच आधार घ्यावा लागतो. (प्रतिनिधी)
पुष्पा गायकवाड, राणी दबडे यांचे नातेवाईक न्यायालयीन आदेशानुसार दोघींना नेण्यासाठी आले होते. मात्र, घरी नेण्यासाठी ते फारसे उत्सुक नसल्याचे दिसून आले. वास्तविक या महिला बऱ्या झाल्या असून, स्वत:चे काम स्वत: करतात. त्यांना घर आठवते, नातेवाईक आठवतात. मात्र, प्रतिष्ठेपायी नातेवाईक त्यांना नाकारतात, ही शोकांतिका म्हणावी लागेल.