वैभववाडी तालुक्यात चक्रीवादळाने दाणादाण; लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 11:17 PM2017-09-10T23:17:18+5:302017-09-10T23:17:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वैभववाडी : तालुक्यात रविवारी सायंकाळी मुसळधार पावसासह झालेल्या चक्रीवादळाने नापणे, नाधवडे तिथवली परिसरात अक्षरश: दाणादाण उडवली. चक्रीवादळामुळे घरे, गोठे व मंदिराचे सुमारे दहा लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी झाडे कोसळल्याने संपूर्ण तालुक्याचा विद्युत पुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित झाला होता. तर तळेरे-वैभववाडी मार्गावर झाडे कोसळल्याने काही काळ एकेरी वाहतूक सुरु होती.
रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. पाऊस सुरु असतानाच जोरदार चक्रीवादळ झाले. चक्रीवादळाच्या तडाख्याने झाड पडल्यामुळे नापणे येथील भवानी मंदिराचा कळस तुटून स्लॅबही कोसळला. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
तसेच नापणे येथील प्रकाश जैतापकर, जयवंत जैतापकर, यशवंत जैतापकर, पांडुरंग जैतापकर यांच्या घरांचे तर हरिश्चंद्र जैतापकर यांच्या गोठ्याचे मोठे नुकसान झाले आहे. दूध डेअरीसमोर झाड कोसळल्याने मुख्य रस्ता बंद झाला होता. तर नाधवडे हेलकरवाडीतील अनिता गुंडये व भागिरथी परबते यांच्या घरांचे नुकसान झाले आहे.
तिथवली शिंदेवाडी येथील सुभाष शिंदे यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळले. तसेच दिगशी येथील स्वप्नील धुरी यांच्या पोल्ट्रीफार्मचे छप्पर उडून मोठे नुकसान झाले. चक्रीवादळामुळे झाडे कोसळल्याने ठिकठिकाणी वीजवाहिन्या तुटून संपूर्ण तालुक्याचा विद्युत पुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित झाला होता.