कुडाळ येथील ऐतिहासिक शिवकालीन घोडेबाव विहिरीची तातडीेने दुरूस्ती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 03:18 PM2017-10-31T15:18:38+5:302017-10-31T15:25:58+5:30
पडझड होत असलेल्या ऐतिहासिक शिवकालीन घोडेबाव विहिरीची पाहणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी करीत विहिरीची तत्काळ दुरूस्ती करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या. कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ऐतिहासिक शिवकालीन घोडेबाव विहीर आहे.
कुडाळ : पडझड होत असलेल्या ऐतिहासिक शिवकालीन घोडेबाव विहिरीची पाहणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी करीत विहिरीची तत्काळ दुरूस्ती करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या.
कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ऐतिहासिक शिवकालीन घोडेबाव विहीर आहे. सध्या या विहिरीत मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्याने तसेच गेली अनेक वर्षे डागडुजी न केल्याने विहिरीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. या ऐतिहासिक वास्तूच्या दुरूस्तीकडे प्रशासनानेही दुर्लक्ष केले आहे.
दरम्यान, या विहिरीची पाहणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी सोमवारी सकाळी केली. यावेळी नगराध्यक्ष विनायक राणे, नगरपंचायत बांधकाम सभापती सुनील बांदेकर, पंचायत समिती सदस्य संदेश नाईक, अनिल खुडपकर, सूर्यकांत नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी रणजित देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कुडाळच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांना विहिरीच्या दुरूस्तीबाबत योग्य त्या सूचना केल्या. तसेच वास्तूच्या ऐतिहासिकतेला धक्का न पोहोचवता डागडुजीचे काम करा, असे आवाहन केले.
यावेळी जाधव यांनी विहिरीच्या दुरूस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून यासाठी पर्यटन विभागातून निधी मिळणार आहे. महिनाभरात दुरूस्तीचे काम सुरू होईल, असे सांगितले.