कणकवली नगरपंचायत पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज आजपासून होणार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 08:23 PM2017-11-17T20:23:03+5:302017-11-17T20:23:11+5:30
कणकवली नगरपंचायतीच्या "प्रभाग 1 - क" येथील रिक्त जागेसाठी 13 डिसेंबरला पोटनिवडणूक होणार आहे.
कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या "प्रभाग 1 - क" येथील रिक्त जागेसाठी 13 डिसेंबरला पोट निवडणूक होणार आहे. त्यासाठी संबधित प्रभागात आचारसंहिता जाहिर झाली असून निवडणूक कार्यक्रमानुसार शनिवार पासून उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत.
कणकवलीतील प्रभाग 1 मधील नगरसेविका अड. प्रज्ञा खोत यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी हि पोट निवडणूक होत आहे.
कणकवली नगरपंचायतीत सध्या कार्यरत असलेल्या नगरसेवकांचा एप्रिल महिन्या मध्ये पाच वर्षाचा कार्यकाल संपणार आहे. त्यापूर्वी कणकवली नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणुक होणार आहे. त्या निवडणुकीत या पोटनिवडणुकीच्या निकालाचे प्रतिबिंब निश्चितच दिसणार आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे.
त्यामुळे त्या अनुषंगाने या पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.या पोटनिवडणुकीसाठी कार्यक्रम जाहिर झाला असून प्रथम ऑनलाईन नामनिर्देशन पत्रे भरायची आहेत. तसेच सुट्टीचा दिवस वगळून कार्यालयीन वेळेत 18 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत नामनिर्देशन पत्रे भरायची आहेत. त्यानंतर 25 नोव्हेंबरला अर्जाची छाननी करण्यात येणार असून उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 30 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्यास मुदत असून उमेदवारांना दुसऱ्या दिवशी चिन्ह वाटप केले जाणार आहे. आवश्यकता भासल्यास 13 डिसेंबर रोजी मतदान घेतले जाणार आहे.तर 14 डिसेंबर रोजी मतमोजणी करून निकाल जाहिर केला जाणार आहे. त्यामुळे सध्या या निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षात खलबते सुरु झाली आहेत.
नगरपंचायतीच्या सध्याच्या नगरसेवकांचा कालावधी एप्रिलमध्ये संपणार आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीसाठी उच्छुक उमेदवारांची संख्या कमी आहे. तसेच राजकीय पक्ष ही पोटनिवडणुक निवडण्यास तितकेसे इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे निवडणूक होणार की नाही ? याबाबत अजूनही साशंकता आहे.