कासवमित्र विश्वास खरेंची धारदार शस्त्राने हत्या हल्लेखोर पर्यटक
By admin | Published: October 1, 2014 11:37 PM2014-10-01T23:37:08+5:302014-10-02T00:08:08+5:30
: सोन्याची चेन गायब
गुहागर : येथील कासवमित्र विश्वास खरे (वय ५५) यांची दोन अज्ञात पर्यटकांनी कोयत्याने डोक्यावर व मानेवर वर्मी वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना आज, बुधवारी सकाळी ९.३० ते दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान घडली. खरे यांच्या गळ्यातील सुमारे तीन लाख रुपयांची दहा तोळ्यांची सोन्याची चेन गायब झाली असल्याने हा खून सोन्याच्या हव्यासापोटी केला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. काल, मंगळवारी सायंकाळी दोन पर्यटक वरचा पाट येथे विश्वास खरे यांच्या ‘खरे प्लेझर पॉर्इंट’ येथे राहण्यासाठी आले. सायंकाळी ६.३० वाजता खरे यांचा मोठा भाऊ विवेक व पुतण्या सचिन यांना विश्वास खरे यांचे ‘खरे प्लेझर पॉर्इंट’ कुठे आहे, अशी विचारणा पर्यटकांनी केली. यावेळी नेहमीप्रमाणे पर्यटक आहेत, असे समजून त्यांना राहण्यासाठी खोली देण्यात आली.
रात्रभर या दोघांनी समुद्रकिनारी माडाच्या बनात असलेल्या खोलीमध्ये मुक्काम ठोकला. सकाळी ६.३० वाजता विश्वास खरे यांच्या पत्नी या पर्यटकांसाठी चहा घेऊन गेल्या. त्यानंतर आॅर्डरनुसार सकाळी ९.३० वाजता कांदापोहे देण्यासाठी गेल्या. यावेळी येथे खरे होते व वातावरण नेहमीसारखेच होते. यानंतर दोन तास होऊन गेले तरी खरे का आले नाहीत, हे पाहण्यासाठी खरे यांच्या पत्नी पर्यटकांच्या खोलीकडे आल्या.
यावेळी पर्यटकांसाठी तातडीने सेवा देण्यासाठी बांधण्यात आलेल्या स्वयंपाक खोलीला बाहेरुन कुलूप लावले होते. खरे यांची दुचाकी ही नेहमीच्या ठिकाणीच होती. अशावेळी खरेंचा आजूबाजूला शोध घेऊनही पत्ता न लागल्याने त्यांनी आपले दीर विवेक खरे यांना बोलावले. त्यांनी किचन शेडच्या दरवाजावरील कुलून तोडले. त्यावेळी विश्वास खरे रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे त्यांना दिसले.
याबाबतचे वृत्त समजताच लोकप्रतिनिधींसह सर्वच गुहागरवासीयांनी घटनास्थळी धाव घेतली. खरे यांचा खून नक्की कोणत्या कारणासाठी झाला असेल, याबाबत ग्रामस्थांमधून उलटसुलट चर्चा रंगली होती.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या अज्ञात खुन्यांनी खरे यांचा खून केल्यानंतर राहत असलेल्या खोलीत अंघोळ करून कपडे बदलून पलायन केले.
रक्ताचे डाग असलेले कपडे एका जॅकेटमध्ये गुंडाळून ठेवण्यात आले होते.
तपासाला गती मिळण्यासाठी खुनी नेमके कुठल्या दिशेला गेले असावेत, यासाठी श्वानपथक मागविण्यात आले. हे श्वानपथक वेलदूर मार्गावर गेले. तेथील गुहागर शाळा क्रमांक दोनजवळ घुटमळले. त्यामुळे खुनी तेथून पळाले असल्याचा अंदाज
पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र, पुढे कोणतीही ठोस माहिती पोलिसांच्या हाती आलेली नाही.
याबाबत पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता सांगितले की, घटनास्थळी खून झाल्यानंतर खरे यांच्या गळ्यातील १०० ग्रॅमची (१० तोळे) अंदाजे तीन लाख रुपयांची सोन्याची चेन वगळता हातातील अंगठ्या, पैशाचे पाकीट, अन्य सर्व वस्तू जागीच असल्याने सध्या तरी सोन्यासाठीच हा खून झाला असावा, असा प्राथमिक
अंदाज आहे.
(प्रतिनिधी)
५५ वर्षीय विश्वास खरे हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणून गुहागर तालुक्यात ओळखले जात होते. कुस्ती खेळ, रेड्यांच्या झुंजीच्या स्पर्धा त्यांची विशेष आवड होती. गेल्या तीन वर्षांत त्यांनी एक हजारांहून अधिक कासवांना जीवदान दिल्याने ‘कासवमित्र’ म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती.