आॅनलाईन तक्रारीसाठी आता केआयओएसके सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 04:02 PM2017-10-14T16:02:14+5:302017-10-14T16:25:55+5:30
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस प्रशासनाचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून आॅनलाईन तक्रार नोंदविण्यासाठीच्या केआयओएसके सेंटरचे उद्घाटन कोकण परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक नवल बजाज यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालयात करण्यात आले.
सिंधुदुर्गनगरी , दि. १४ : जिल्हा पोलीस प्रशासनाचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून आॅनलाईन तक्रार नोंदविण्यासाठीच्या केआयओएसके सेंटरचे उद्घाटन कोकण परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक नवल बजाज यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालयात करण्यात आले. या आॅनलाईन सुविधा केंद्रामुळे पोलीस दलाशी संबंधित विविध प्रकारची माहिती मिळविणे आणि तक्रार दाखल करणे आता सोपे होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचा कारभार लोकाभिमुख व्हावा, त्याला आधुनिकतेची जोड मिळावी यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. कोणत्याही व्यक्तीला कोठूनही आॅनलाईन तक्रार नोंदविता यावी यासाठी जिल्हा प्रशासनाने अॅप तयार केले आहे.
यासाठी आॅनलाईन तक्रार नोंदीच्या केआयओएसके सेंटर या आॅनलाईन सुविधा केंद्राची जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात स्थापना करण्यात आली असून या केंद्राचे कोकण परिक्षेत्राचे महानिरीक्षक नवल बजाज यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन याचे करण्यात आले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मजा चव्हाण, दयानंद गवस, पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
केआयओएसके सेंटरवर नागरिकांना आॅनलाईन तक्रार नोंदविता येणार आहे. आॅनलाईन तक्रार नोंदविताना कोणाला काय अडचण निर्माण झाल्यास ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील केआयओएसके सुविधा केंद्रावर येऊन आपली तक्रार दाखल करू शकतात अशी माहितीही जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी दिली.
यात बेपत्ता व्यक्ती, संशयास्पद व्यक्ती, मोबाईल चोरी, चोऱ्या, मृतदेह, वाहन चोरी आदी तक्रारी नोंदविता येणार आहेत. याशिवाय या केआयओएसके या सेंटरवरून राज्यातील गुह्यांची सांख्यिकी माहिती, गणेशोत्सव-नवरात्रौत्सव परवानगी अर्ज करता येणार आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. यात पोलीस नियंत्रण कक्षात सीसीटीव्हीचे लाईव्ह फुटेज, आॅनलाईन जीपीएस ट्रॅकिंग कार्यप्रणाली, प्रतिसाद अॅप, दामिनी पथकासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा, सागरी आणि महिला सुरक्षेसाठीचे हेल्पलाईन नंबर आदी सुविधा निर्माण करुन देण्यात आल्या आहेत. याचबरोबर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नूतनीकरणाचाही शुभारंभ कोकण परिक्षेत्राचे महानिरीक्षक नवल बजाज यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील केआयओएसके आॅनलाईन सुविधा केंद्राचा आणि कार्यालयाच्या नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ कोकण परिक्षेत्राचे महानिरीक्षक नवल बजाज यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम उपस्थित होते.