कोकणचं निसर्गवैभव मनोरुग्णालयाच्या भिंतींवर
By admin | Published: April 26, 2015 10:11 PM2015-04-26T22:11:59+5:302015-04-27T00:13:07+5:30
पर्यटन महोत्सव : तरूण कलाकारांच्या कुंचल्यात अप्रतिम कला...
रत्नागिरी : पर्यटन महोत्सवाचा प्रचार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केली जात असताना शहरातील भिंतीवर पर्यटन स्थळांची चित्रे रेखाटण्यात येत आहेत. त्यामुळे शहर निश्चितच सुशोभित होणार आहेत. शहरातील अशा प्रकारच्या भिंती रंगवल्या किंवा एकापेक्षा अधिक बसेसची रंगरंगोटी केली किंवा महत्त्वाच्या जागा विकसित करून त्याठिकाणी पुतळे उभारले तर नक्कीच शहराचे रूपडे बदलण्यास मदत होईल.मे मध्ये होणाऱ्या पर्यटन महोत्सवाची जय्यत तयारी जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. कोकणची ओळख दाखविणारे आंबे असो वा मासे यांची चित्रे रेखाटण्यात येत आहेत. याशिवाय जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळे किंवा कोकणचे सौंदर्य अभिव्यक्त करणाऱ्या कविता ठिकठिकाणी रंगविल्या तर नक्कीच शहरात येणाऱ्या पर्यटकांची उत्सुकता वाढेल. किंबहुना भविष्यात पर्यटकांची संख्यादेखील वाढेल.सध्या एकच शहरी बसेस रंगवण्यात आली आहे. ग्रामीण भागात धावणाऱ्या किंवा लांब पल्याच्या बसेस पैकी १० बसेस रंगवल्या तर जिल्ह्याच्या विविध ठिकाणाबरोबर अन्य जिल्ह्यातही प्रचार होण्यास मदत होईल. मात्र, याबाबत प्रशासनाने निर्णय घेणे गरजेचे आहे.त्याचबरोबर शहरातील महत्वाच्या ठिकाणी जिल्ह्याची संस्कृती, व्यवसाय यांची ओळख होणारे पुतळे बसविले तर नक्कीच शहराची सांैदर्यवृध्दी होईल. जिल्हा प्रशासनाने स्थानिक कलाकारांच्या मदतीने मनोरूग्णालयाबाहेर असणाऱ्या भिंती रंगविण्यास प्रारंभ केला आहे. या भिंतीवर चित्रे रेखाटण्याचे काम देवरुखातील डी-कॅड तसेच सह्याद्री स्कूल आॅफ आर्ट या संस्थांमधील विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. कोकणातील निसर्ग वैभव त्याचबरोबर संस्कृती आता रत्नागिरी शहरातील विविध भिंतींवर दिसणार असून पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन महोत्सव यशस्वी होण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. (प्रतिनिधी)
1भिंतीवर चित्रे रेखाटण्याचे काम देवरुखातील डी-कॅड तसेच सह्याद्री स्कूल आॅफ आर्ट येथील विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे.
2मे मध्ये होणाऱ्या पर्यटन महोत्सवाची जय्यत तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. कोकणची ओळख दाखवणारे आंबे वा मासे यांची चित्रे रेखाटण्यात येत आहेत.