कुडाळ पंचायत समिती सभेत शिक्षण विभागाला धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 04:01 PM2017-10-26T16:01:50+5:302017-10-26T16:09:43+5:30

 कुडाळ तालुक्यातील अनेक शाळांच्या इमारती धोकादायक स्थितीत असून शिक्षण विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य अरविंद परब यांनी कुडाळ पंचायत समितीच्या मासिक सभेत केला. सर्वच पंचायत समिती सदस्यांनी या प्रश्नी शिक्षण विभागाला धारेवर धरले.

Kudal Panchayat Samiti in the meeting held the education department Dharevar | कुडाळ पंचायत समिती सभेत शिक्षण विभागाला धरले धारेवर

कुडाळ पंचायत समिती सभेत शिक्षण विभागाला धरले धारेवर

googlenewsNext
ठळक मुद्देकुडाळ तालुक्यातील शाळांच्या इमारती धोकादायक संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष शाळा दुरूस्तीच्या विलंबाबाबत जिल्हा प्रशासनाकडे बोट

कुडाळ  , दि. २६ : कुडाळ तालुक्यातील अनेक शाळांच्या इमारती धोकादायक स्थितीत असून शिक्षण विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य अरविंद परब यांनी कुडाळ पंचायत समितीच्या मासिक सभेत केला. सर्वच पंचायत समिती सदस्यांनी या प्रश्नी शिक्षण विभागाला धारेवर धरले.

शिक्षण विभागाने याबाबत शाळा दुरूस्तीच्या विलंबाबाबत जिल्हा प्रशासनाकडे बोट दाखविले. तसेच सभागृहात मांडलेल्या सूचनांचे पालन होत नसल्याबाबत पंचायत समिती सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

कुडाळ पंचायत समितीची मासिक सभा बुधवारी सभापती राजन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती श्रेया परब, उपमुख्यकार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी एस. बी. भोई, पंचायत समितीचे सदस्य व सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते. सभेच्या सुरूवातीलाच सदस्य जयभारत पालव यांनी हुमरमळा शाळेच्या धोकादायक इमारतीचा प्रश्न उपस्थित केला.

दरम्यान, या चर्चेत सदस्य अरविंद परब यांनी भाग घेऊन त्यांनी सांगितले की, तालुक्यात अशा कितीतरी शाळांच्या इमारती धोकादायक स्थितीत असून सुध्दा याकडे गांभीर्याने बघितले जात नाही.

काही शाळांच्या भिंती ह्या मातीच्या असून त्यांना तडे गेले आहेत. छप्पर मोडकळीस आले आहे. अशा या धोकादायक इमारतीखाली छोटी छोटी मुले शिक्षण घेत आहेत. याबाबत आम्ही सभागृहात सूचना मांडतो, प्रस्ताव देतो, मात्र त्याची अंमलबजावणी जर होत नसेल तर आम्ही सभागृहात प्रश्न का मांडायचे? असा सवाल त्यांनी केला.


प्राजक्ता प्रभू यांनी वालावल बांधकोंड शाळेचा प्रश्न २०१३ सालापासून प्रलंबित असल्याचे सांगितले. तर सदस्य सुबोध माधव यांनी पाट केंद्रशाळेच्या बाबतीत हाच प्रश्न उपस्थित करून दुरूस्तीचा प्रस्ताव देऊन पाच वर्षे उलटली आहेत. पण याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे सांगितले.


याबाबत शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी गोडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, धोकादायक शाळा दुरूस्तीच्या प्रस्तावांचा प्राधान्यक्रम हा वरिष्ठस्तरावरून बदलला जातो. त्यामुळे आम्ही करायचे काय? असा प्रश्न उपस्थित करून शाळा दुरूस्तीच्या विलंबाबाबत जिल्हा प्रशासनाकडे बोट दाखविले.


पिंगुळी ते पाट व माणगाव तिठा आदी ठिकाणच्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तसेच रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढल्याने रस्ता वाहन चालविण्यास धोकादायक बनला आहे. याबाबत गेल्या सभेत सूचना मांडण्यात आल्या होत्या. पण याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे सदस्य सुबोध माधव आणि शरयू घाडी यांनी सांगितले. त्यावर बांधकाम विभागाच्या अनामिका जाधव यांनी आम्ही या रस्त्यांची पाहणी केली आहे. पण टेंडर मंजूर झाले नसल्याने काम झालेले नसल्याचे सांगितले.


तर प्रभू यांनी वाघोसेवाडी मार्गे जाणारी एसटी फेरी अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता का बंद करण्यात आली, याचा जाब एस.टी. प्रशासनाच्या अधिकाºयांना विचारला. तर नूतन आईर यांनी वेताळ बांबर्डे व सुप्रिया वालावलकर यांनी पणदूर येथील शाळेतील मुलांच्या गैरसोयीबाबत प्रश्न उपस्थित करून या मुलांना एस.टी. बस उभ्या केल्या जात नसल्याचे सांगितले.

मुलांच्या सोयीसाठी फेऱ्या मध्ये बदल करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. तर कृषी विभागाकडून शेती नुकसानीचे पंचनामे करण्याचे अधिकार आम्हाला नाहीत. जे अहवाल प्राप्त झाले ते आम्ही जिल्हा परिषदेकडे पाठवलेले आहेत, असे सांगितल्यावर सदस्यांनी कृषी विभागाला धारेवर धरले.

जबाबदारी टाळू नका : विजय चव्हाण

शिक्षण विभागाचे प्रतिनिधी म्हणून तालुक्याची जबाबदारी तुमची आहे. त्यामुळे ही जबाबदारी तुम्ही टाळू शकत नाही. तुम्ही हा विषय लावून धरला पाहिजे, पाठपुरावा झाला पाहिजे, तुमचे प्रयत्न ज्या ठिकाणी अपुरे पडतील त्यावेळी आम्हाला सांगा, मग आम्ही आमचे प्रयत्न सुरू करतो, असा सल्ला गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाºयांना दिला.

Web Title: Kudal Panchayat Samiti in the meeting held the education department Dharevar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.