राणेंचा 'स्वाभिमान' जागला, लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 04:40 PM2018-12-30T16:40:08+5:302018-12-30T16:40:21+5:30
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते नारायण राणेंनी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली आहे.
कणकवलीः राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते नारायण राणेंनी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा लढणार हे अद्याप जाहीर केलेलं नसलं तरी निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर याचा निर्णय घेऊ, अशी माहिती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा. नारायण राणे यांनी दिली. कणकवलीतल्या पडवे येथील लाइफटाइम हॉस्पिटलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीतही पाच राज्यांच्या निकालाप्रमाणेच धक्का बसेल, असं राणे म्हणाले आहेत. तसेच यावेळी त्यांनी भाजपा नेते प्रमोद जठार यांच्यावरही टीका केली. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांना राजकारण कळत नाही. ते राजकारणात अजून लहान आहेत. माझा पक्ष एनडीएचा घटक पक्ष आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे. तसेच पवारांसाहेबांसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री कर्तृत्वशून्य आहेत. पालकमंत्र्यांना निधी कसा खर्च करायचा हेसुद्धा माहीत नाही. म्हणूनच नाना पाटेकरांना आमचा जिल्हा दत्तक घ्यायला सांगतात. हा माणूस उद्या राज्यही विकायला काढले, असं म्हणत राणेंनी केसरकरांवर शरसंधान साधलं आहे.
जिल्ह्यात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराला पालकमंत्रीच जबाबदार आहेत, असा आरोपही राणेंनी केला आहे. मात्र, स्वतः उमेदवार असणार की नाही ? याचे उत्तर गुलदस्त्यात ठेवले. तसेच विधानसभा निवडणूक लढणार का? याचेही उत्तर देण्याचे त्यांनी टाळले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा परिषद प्रभारी अध्यक्ष रणजित देसाई, विषय समिती सभापती जेरॉन फर्नांडिस, संतोष साटविलकर, रवींद्र टेंबुलकर आदी उपस्थित होते.