रत्नागिरीचे लोकमान्य टिळक स्मारक सुटीच्या दिवशी बंद
By admin | Published: April 1, 2015 10:51 PM2015-04-01T22:51:11+5:302015-04-02T00:42:40+5:30
पर्यटकांची गैरसोय : परजिल्ह्यातील लोकांच्या पदरी निराशा
रत्नागिरी : लोकमान्य टिळक स्मारक रत्नागिरी शहराचे भूषण आहे. परंतु शासकीय सुटीच्या दिवशी स्मारक बंद ठेवण्यात येत असल्यामुळे परजिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांना स्मारक न पाहताच परत फिरावे लागत आहे.शहरातील मधल्या आळीला लोकमान्य टिळक स्मारकामुळे टिळक आळी नाव पडले. गणपतीपुळे, पावस मार्गावर येणाऱ्या पर्यटकांची गर्दी स्मारक पहाण्यासाठी दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु सुटीच्या दिवशी स्मारक सुरु ठेवण्याऐवजी चक्क बंद ठेवण्यात येते. याशिवाय आठवड्यातून अनेकवेळा स्मारक बंदच असते. परिणामी परगावच्या पर्यटकांना रस्त्यावरुनच स्मारक पाहून माघारी फिरावे लागते.लोकमान्य टिळकांच्या स्मारकाला अनेकजण सुटी पाहूनच भेट देतात. कारण, सलग सुट्ट्या असल्या तरच अनेकजण फिरण्याचा बेत आखतात. मात्र, त्याचकाळात हे स्मारक बंद असल्याने गैरसोय निर्माण होते.टिळक आळीमध्ये रस्त्याच्या दुतर्फा अनेक नवीन सदनिका उभारण्यात आल्या आहेत. नगरपालिकेने सदनिका धारकांना परवानगी तर दिली आहे, परंतु अनेक सदनिकांसाठी पार्किंग सुविधा उपलब्ध नाही. परिणामी या परिसरातील अनेक सदनिका धारकांना रस्त्यावरच गाड्या लावाव्या लागतात. याशिवाय हॉटेल्स तसेच अन्य कामांसाठी येणाऱ्या परगावातील मंडळी टिळक आळीमध्ये गाड्या पार्किंग करुन शहरात अन्य कामासाठी निघून जातात.त्याचप्रमाणे स्मारक पहाण्यासाठी आलेल्या मोठ्या गाड्या रस्त्याच्या कडेला लावलेल्या असतात. या मार्गावर शहरी वाहतूक सुरु आहे. त्यामुळे मोठ्या गाड्यांमुळे तसेच रस्त्याच्या कडेला लावलेल्या छोट्या- मोठ्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. परंतु या ठिकाणी वाहतूक पोलीस, प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. किंबहुना टिळक आळीतील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)
लवकरच उन्हाळी सुटी होणार आहे. उन्हाळी सुटीमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असते. परंतु शासकीय सुट्टीच्या दिवशी स्मारक बंद ठेवल्यामुळे पर्यटक परत फिरतात. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने स्मारकामध्ये सुटीच्या दिवशीही आपल्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था करणे गरजेचे आहे. येथे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांचे केलेले पार्किंग त्रासदायक ठरत आहे. वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करुनसुद्धा दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्याकडे निवेदनाद्वारे सुटीच्या दिवशी स्मारक सुरु ठेवण्याची व टिळक आळी रस्त्यावरील पार्किं ग व्यवस्था बंद करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
- राजाभाऊ लिमये, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष