मडुरा-ख्रिश्चनवाडीत एकजण लेप्टो पॉझिटिव्ह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 11:41 AM2017-11-15T11:41:52+5:302017-11-15T11:46:51+5:30
मडुरा-ख्रिश्चनवाडी येथील रुजाय बस्तॅव फर्नांडिस (४२) हे लेप्टो पॉझिटिव्ह आढळल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. फर्नांडिस काही दिवस तापाने आजारी होते. त्यांचा रिपोर्ट लेप्टो पॉझिटिव्ह आला.
बांदा : मडुरा-ख्रिश्चनवाडी येथील रुजाय बस्तॅव फर्नांडिस (४२) हे लेप्टो पॉझिटिव्ह आढळल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. फर्नांडिस काही दिवस तापाने आजारी होते. त्यांचा रिपोर्ट लेप्टो पॉझिटिव्ह आला.
मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आल्याचे बांदा प्राथमिक आरोग्यकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले.
मडुरा, पाडलोस, इन्सुली येथे तापसरीच्या रुग्णांमध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये वाढ झाली असूनही आरोग्य यंत्रणेने कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप मडुरावासीयांनी केला आहे.
रुजाय फर्नांडिस हे गेले तीन दिवस तापाने आजारी होते. त्यांच्यावर बांदा प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचार सुरु होते. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी मणिपाल (गोवा) येथे पाठविण्यात आले होते. त्यांना लेप्टोची लागण झाल्याचे निदान झाल्याचा अहवाल आरोग्य केंद्राला प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली.
मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. मडुरा परिसरात लेप्टोचा रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणादेखील सतर्क झाली आहे.
मडुरा ख्रिश्चनवाडी येथे लेप्टोचा रुग्ण आढळल्याने तसेच गेल्या दोन दिवसांत मडुरा, पाडलोस, इन्सुली परिसरात तापसरीच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
या सर्वांच्या रक्ताचे नमुने आरोग्य विभागाकडून तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. मात्र आरोग्य यंत्रणेने या परिसरात दुर्लक्ष केल्याच्या आरोप करत स्थानिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
मडुरा येथे लेप्टोचा रुग्ण सापडल्याने आरोग्य विभागाने लवकरच याठिकाणी सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच शेतकऱ्यांनी भातकापणीसाठी जाताना हॅण्डग्लोज व बुटांचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.