शिवसेनेचं चक्रव्यूह भेदून नितेश यांनी सिद्ध केली कणकवलीतील 'राणेशाही'!
By वैभव देसाई | Published: October 25, 2019 05:23 PM2019-10-25T17:23:28+5:302019-10-25T18:27:39+5:30
कणकवली मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला अन् नितेश राणेंनी विजयाचा गुलाल उधळला.
- वैभव देसाई
कणकवली मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला अन् नितेश राणेंनी विजयाचा गुलाल उधळला. गेल्या अनेक दिवसांपासून कणकवली हा मतदारसंघ राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचे पुत्र नितेश राणेंना पक्षात घेऊन भाजपानं उमेदवारी दिल्यापासून या मतदारसंघात राजकीय उलथापालथी सुरू झाल्या. कणकवली मतदारसंघावरूनच युतीमध्ये मिठाचा खडा पडला. राज्यात शिवसेना-भाजपाची महायुती असतानाही भाजपाच्या हक्काच्या मतदारसंघात फक्त राणेंना विरोध करण्यासाठी शिवसेनेनं उमेदवार दिला. विशेष म्हणजे शिवसेनेनं दुसरा तिसरा कोणी नव्हे, तर जो गेल्या 25 वर्षांपासून राणेंची सावली बनून वावरत होता, सहकार क्षेत्रातील दांडगा अनुभव असलेल्या सतीश सावंतांनाच फोडून राणेंच्या विरोधात उभे केले. त्यामुळे साहजिकच या मतदारसंघात नारायण राणेंची प्रतिष्ठा पणाला लागली. कारण ही त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई होती.
नारायण राणेंनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानं संदेश पारकर आणि अतुल रावराणेंसारखे राणेविरोधी गटही सक्रिय झाले. संदेश पारकर यांना भाजपानं उमेदवारी न दिल्यानं त्यांनी बंडखोरी केली. बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कणकवली मतदारसंघात चुरस आणखीच वाढत गेली. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या उक्तीप्रमाणे संदेश पारकर आणि अतुल रावराणे गटानं सतीश सावंतांचा प्रचार केला. संदेश पारकर, अतुल रावराणे, संदेश पटेल, वैभववाडीचे सभापती लक्ष्मण रावराणे या चौघांची पक्षविरोधी काम केल्यामुळे भाजपातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली. कालांतरानं त्यांना शिवसेनेनं काही आश्वासनं दिली. या नेत्यांसह शिवसेनेनं सगळी ताकद पणाला लावून सतीश सावंतांचा प्रचार केला.
सतीश सावंतांनी मातोश्रीच्या फेऱ्या मारून शिवसेनेची उमेदवारी मिळवली आणि त्यानंतर राणेंचे एक एक सहकारी आपल्या कंपूत घेण्याचा कार्यक्रम सुरू केला. एकेकाळी राणेंचे कट्टर समर्थक राहिलेल्या दिगंबर पाटील, गुलाबराव चव्हाण यांनी सतीश सावंतांबरोबर शिवसेनेत प्रवेश केला. सतीश सावंत हे गेल्या 25 वर्षांपासून सिंधुदुर्गाच्या राजकारणात सक्रिय होते. राणेंचे विश्वासू असतानाच त्यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांशी दांडगा जनसंपर्क ठेवला. सहकार क्षेत्राचा अनुभव असलेल्या सावंतांनी खेडोपाडी जाऊन जनाधार वाढवण्याचा प्रयत्न केला. सहकारी संस्था आणि या क्षेत्रातील दांडग्या अनुभवाचा सावंतांनी पुरेपूर वापर केला. पण तरीही त्यांना या लढतीत विजय संपादन करता आलेला नाही.
नारायण राणे शिवसेनेत असताना सतीश सावंतांना शिवसेनेचं जिल्हाध्यक्षपद मिळालं, राणे काँग्रेसवासी झाल्यानंतर त्यांना काँग्रेसचं सिंधुदुर्गातील जिल्हाध्यक्षपद मिळालं. जिल्हा परिषदेवर कायमचं सदस्यत्व देत राणेंनीही त्यांना बळ दिलं. त्यांची राज्यातल्या सक्रिय राजकारणात उतरण्याची तीव्र इच्छा होती, परंतु त्यांना कधी तशी संधीच मिळाली नाही. त्यामुळे नारायण राणेंना सोडचिठ्ठी देत त्यांनी नितेश राणेंना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. परंतु नितेश राणेसुद्धा कणकवलीचे विद्यमान आमदार असल्यानं त्यांनी देवगड, वैभववाडी आणि कणकवली तालुक्यांतील अनेक गावांमध्ये रस्ता असो किंवा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. काही गावांमध्ये त्यांनी गावकऱ्यांच्या या समस्या सोडवल्या, तर काही ठिकाणी हातात सत्ता नसल्यानं त्यांना अपयश आलं.
2014च्या निवडणुकीत नितेश राणे यांनी काँग्रेसकडून प्रमोद जठार यांना आव्हान दिलं. त्यावेळी नितेश राणे 25 हजार मतांनी निवडून आले. यावेळचा त्यांचा विजय त्यापेक्षा जास्त मतांनी झाला आहे. पण मताधिक्य अधिक आहे म्हणूनच फक्त हा विजय मोठा नाही, तर यावेळी ज्या वातावरणात त्यांनी विजय मिळवलाय, तो त्यांना नवी ताकद देणारा आहे. नितेश राणेंनी 84,504 मतं मिळवून बाजी मारली आहे, तर सतीश सावंत यांना 56,388 मतं मिळाली आहेत. म्हणजेच नितेश राणेंचं मताधिक्य 28,116 आहे. हा विजय भाजपामधील त्यांचा पुढचा प्रवास सुकर करणार का, हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं आहे.