माउलीचरणी जनसागर लोटला
By admin | Published: November 15, 2016 11:23 PM2016-11-15T23:23:56+5:302016-11-15T23:23:56+5:30
लाखोंनी घेतले देवीचे दर्शन : सोनुर्ली जत्रोत्सवात गोवा, कर्नाटक, मुंबईतूनही भाविक
तळवडे : दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तळकोकणातील सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील श्री देवी माउलीच्या दर्शनासाठी मंगळवारी जनसागर लोटला. या जत्रोत्सवास संपूर्ण कोकण, गोवा, कर्नाटकसह मुंबई आणि विविध ठिकाणांहून आलेले हजारो भक्तगण माउलीचरणी नतमस्तक झाले. ग्रामस्थ, देवस्थान कमिटीने प्रशासनाला हाताशी धरून केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे यावर्षी देवीचे दर्शन सुलभ होऊन वाहनांची कोंडीही जाणवली नाही.
जत्रोत्सवासाठी जमलेल्या जनसागरामुळे मंंदिराचा पूर्ण परिसर आणि सोनुर्ली गावातून दोन्ही बाजूंनी जाणारे रस्ते गर्दीने फुलून गेले होते. सकाळी देवीच्या पाषाणावर परंपरेप्रमाणे अभिषेक करण्यात आला. शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करून सोन्या-चांदीच्या वस्त्रालंकारांनी देवीची मूर्ती सजविण्यात आली. परंपरेनुसार धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर दर्शनासाठी भक्तगणांना सोडण्यात आले. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांची गर्दी झाली होती. हळूहळू भक्तांची संख्या वाढू लागल्याने नियोजित करण्यात आलेल्या रांगांमधून भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले. देवीच्या दर्शनासाठी संपूर्ण मंदिराभोवती भक्तांच्या रांगा लागल्या होत्या.
मंदिराभोवती व सोनुर्ली गावातून फुललेल्या जनसागरासह मंदिराच्या दोन्ही बाजूंनी दोन किलोमीटरपर्यंत विविध वस्तूंची, खाद्यपदार्थांची दुकाने थाटली होती.
दरवर्षी सोनुर्ली देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तगणांची वाहनांची वर्दळ पाहून यावर्षी चारचाकी वाहनांसाठी विशेष वाहनतळ उभारण्यात आला होता. सायंकाळी वाजतगाजत गावकरी आणि मानकऱ्यांसह ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने श्री माउलीची पालखी मंदिराकडे दाखल झाली. यावेळी पालखीत आसनारूढ झालेली देवीची मूर्ती आकर्षण ठरत होती.
मळगाव-सोनुर्ली गावचे हे एकच देवस्थान असल्याने दोन्ही गावांतील भाविक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. भक्तगणांकरिता सोनुर्ली माउली देवस्थान कमिटी व सोनुर्ली माउली भक्तगण मित्रमंडळातर्फे खास पाण्याची व मंडपाची व्यवस्था करण्यात आली.
आरोग्य विभाग, वीज वितरणचे कर्मचारी, बांधकाम विभाग कर्मचारीही यावेळी उपस्थित होते. एस. टी. महामंडळाने यावर्षी श्री देवी सोनुर्ली माउली भक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याकरिता नियोजनबद्धरीत्या एसटी गाड्या उपलब्ध करून दिल्या होत्या.
यासाठी सोनुर्ली माउली देवस्थान कमिटी व माउली मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
रात्री लोटांगणांनी नवस फेडणार
सोनुर्ली जत्रोत्सव हा लोटांगणासाठी प्रसिद्ध आहे. जत्रोत्सवादिवशी रात्री दहा वाजता भाविक लोटांगणे घालून नवस फेडतात. यावर्षी हजारो भाविक लोटांगण घालण्यासाठी सज्ज झाले असून, हा सोहळा पाहण्यासाठी रात्री भाविकांची गर्दी होणार आहे.