Maharashtra Bandh : सिंधुदुर्ग जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 10:54 AM2018-07-26T10:54:06+5:302018-07-26T12:20:50+5:30
मराठा समाजाच्या आंदोलकांनी मध्यरात्रीपासून टायर जाळून रस्ते बंद केले आहेत.
सिंधुदुर्ग - सिंधुदुर्गमधील मराठा समाज आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाला आहे. मध्यरात्रीपासूनच आंदोलन पेटलं असून ठिकठिकाणी टायर जाळून, झाडे तोडून रस्ते रोखण्यात आले आहेत. शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक आंदोलकांनी थांबविली असून जिल्ह्यातील बाजारपेठा बंद आहेत. रिक्षा संघटनेनेही रिक्षा बंद करून आंदोलनात घेतला सहभाग आहे.
मराठा समाजाच्या आंदोलकांनी मध्यरात्रीपासून टायर जाळून रस्ते बंद केले आहेत. वेंगुर्ले-तुळसमार्गे सावंतवाडी व वेंगुर्ले मठ मार्गे सावंतवाडी हे दोन्ही महत्वाचे मार्ग आंदोलनकर्त्यांनी बंद केले आहे. रेडी-शिरोड्यात रात्रीपासूनच आंदोलनाला सुरुवात झाली. रस्त्यावर झाडे, टायर जाळून वाहतूक ठप्प केली आहे. तालुक्यातील एसटी फेऱ्या रद्द झाल्या आहेत. मातोंडमधील वस्तीची एसटी तुळस सुभाषवाडी येथे मध्यरात्री पंक्चर केली आहे. पेंडूर येथे मळेवाड-सावंतवाडी महामार्गावर भलीमोठी झाडे तोडून टाकल्यानं महामार्ग बंद आहे. तालुक्यासह शहरातही तणावाचे वातावरण आहे.
वस्तीच्या गाड्या अडकल्या
बांदयात रात्रीपासून अनेक ठिकाणी टायर जाळून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सकाळी ग्रामीण परिसरातून येणाऱ्या अनेक वस्तीच्या गाड्या अडकल्या आहेत. झाडे तोडून रस्ता बंद केल्यामुळे विद्यार्थी व कामावर जाणारे अडकून पडले आहेत.पोलिसांची गस्त सुरू आहे.
कुडाळमध्ये दहा एसटी बस फोडल्या
कुडाळमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी एस.टी. च्या दहा बस फोडल्या. रात्री बारा वाजता मारूती ओमनीची तोडफोड करून ती जाळण्यात आली. माणगाव खोरे केले चक्काजाम करण्यात आले. आकेरी व झाराप रस्ता बंद करण्यात आला. माणगाव हायस्कूलमधील मुलांना सुरक्षित बाहेर काढून हायस्कूल बंद पाडण्यात आले. 'एक मराठा लाख मराठा'च्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. मुंबई-गोवा महामार्गावर झाडे पाडून चक्काजाम करण्यात आला. महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात चक्काजाम यशस्वी
मराठा क्रांतीची कुडाळमध्ये भव्य रॅली काढण्यात येणार आहे. मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत रॅलीचे नेतृत्व करणार आहेत. आमदार वैभव नाईक कुडाळ येथील एसआरएम चौकात उपस्थित झाले आहेत.