मांगेली-फणसवाडीत पाण्याची समस्या
By admin | Published: May 10, 2016 02:11 AM2016-05-10T02:11:07+5:302016-05-10T02:26:11+5:30
ग्रामस्थांचा सवाल : पाणी योजनेची प्रतिक्षा संपणार कधी? ; प्रशासनाचे दुर्लक्ष
गजानन बोेंद्रे -- साटेली भेडशी --निसर्गरम्य अशा डोंगर रांगामध्ये आपल्या दुधाळ पाण्याच्या धारांनी देशासह विदेशी पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या धबधब्यामुळे मांगेलीला मोठी ख्याती निर्माण झाली आहे. वास्तविक पाहता येथे असणारा पर्यटकांचा ओढा पाहता येथे सर्व सोयी पुरविण्याची गरज आहे. मात्र या सुविधा राहील्या बाजूला पण मांगेली-फणसवाडी येथील ग्रामस्थांना आजही पाण्यासारख्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. वाडीसाठी स्वतंत्र नळपाणी योजना राबवण्याची मागणी प्रशासनाकडून केराची टोपली दाखवण्यात आली असून सध्या या ग्रामस्थांना तळीच्या पाण्यावरच अवलंबून लागत आहे. तर कधी-कधी दूषित पाण्याच्या समस्येलाही तोंड द्यावे लागते. त्यामुळे स्वतंत्र पाणी योजनेसाठी ग्रामस्थांंची प्रतिक्षा संपणार तरी कधी? असा सवाल निर्माण झाला आहे.
गोवा राज्याच्या सीमेवरील व महाराष्ट्र राज्याचे गोव्याकडील शेवटचे टोक म्हणून मांगेली गावाची ओळख. पण या गावाची राष्ट्रीय पातळीवरील खरी ओळख झाली ती येथील निसर्गरम्य ठिकाणच्या धबधब्यामुळे. येथे कोसळणारा धबधबा हा दोन धारांमधून कोसळत असल्याने त्याला पर्यटकांची विशेष पसंती लाभली आहे. पण येथे आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात प्रशासनाची दिरंगाई अजूनही कायम आहे. त्यामुळे सुंदर धबधबा, पर्यटकही भरपूर पण सेवा देणारे प्रशासन कमजोर अशी काहीशी अवस्था येथील झाली आहे. जर येथे आवश्यक सोयी सुविधा निर्माण केल्या तर परिसरातील स्थानिकांना नवीन रोजगाराची संधी मिळू शकेल पण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानिकांच्या आकांक्षांवर पाणी सोडण्याचे काम केले आहे.
हा गाव चार वाड्यांमध्ये विस्तारलेला आहे. देऊळवाडी, फणसवाडी येथील ग्रामस्थांना दरवर्षी पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. टंचाईच्या नावाखाली निधी खर्च पडतो. पण प्रत्यक्षात उपाययोजना होत नाही. योजना चोरीला जाण्याचे प्रकार आजही ग्रामीण भागात पहायला मिळतात. वरील दोन्ही वाड्यांवर प्रशासनाकडून अनेकवेळा खर्च करण्यात आला. मग त्या योजना कार्यान्वित का नाहीत? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. फणसवाडी येथे एक लहान तळी आहे. या तळीचे पाणी गेली अनेक वर्षे ग्रामस्थ पित आले आहेत. नैसर्गिक झरा असल्याने येथील पाणी कमी होताना दिसत नाही. काही प्रमाणात त्यात गाळही साचला आहे. मे अखेरपर्यंत येथे पाणीटंचाई भासते. पण आजही मांगेली फणसवाडीसाठी स्वतंत्र नळपाणी योजना नसल्याने तळीच्या पाण्यावर त्यांना आपली तहान भागवावी लागत
आहे. (प्रतिनिधी)