सिंधुदुर्ग : सुंदरवाडी महोत्सवाची जल्लोषी सांगता, कलाकारांनी केली भन्नाट गाणी सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 06:29 PM2018-02-27T18:29:07+5:302018-02-27T18:29:07+5:30
हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे गायक वैशाली सामंत, राहुल सक्सेना आणि आदर्श शिंदे यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या एकापेक्षा एक अशा भन्नाट गाण्यांच्या सादरीकरणाने सुंदरवाडी महोत्सवाची जल्लोषात सांगता झाली.
सावंतवाडी : हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे गायक वैशाली सामंत, राहुल सक्सेना आणि आदर्श शिंदे यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या एकापेक्षा एक अशा भन्नाट गाण्यांच्या सादरीकरणाने सुंदरवाडी महोत्सवाची जल्लोषात सांगता झाली.
तिघांनीही आपल्या मधुर आवाजात प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करीत जागेवर खिळवून ठेवले. यावेळी वन्समोअर, टाळ््या व शिट्या या त्रिवेणी संगमाची उत्स्फूर्त अशी दादही सावंतवाडीकरांकडून देण्यात आली. एकूणच तिसऱ्या वर्षीचा हा महोत्सव पुन्हा एकदा सर्वांसाठी यादगार ठरला.
सुंदरवाडी महोत्सवात आदर्श शिंदे यांनी एकापेक्षा एक सरस गाणी सादर केली.
स्वाभिमान पक्षाच्यावतीने माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून तालुकाध्यक्ष संजू परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी येथील जिमखाना मैदानावर सुंदरवाडी महोत्सवाचे यंदा तिसऱ्या वर्षी आयोजन करण्यात आले होते. सलग दोन दिवस बहारदार कार्यक्रमांच्या मेजवानीनंतर तिसऱ्या दिवशीचा सांगता कार्यक्रमही तितकाच दर्जेदार ठेवण्यात आला होता.
हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे गायक वैशाली सामंत, राहुल सक्सेना आणि आदर्श शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असलेल्या हिंदी व मराठी सुरेल गाण्यांचा बहारदार नजराणा यावेळी उपस्थित सावंतवाडीकरांना अनुभवायला मिळाला.
सुंदरवाडी महोत्सवात राहुल सक्सेना यांनी एकापेक्षा एक सरस गाणी सादर केली.
सुरुवातीलाच प्रित की मोह ऐसी लगी...तेरे नाम से जिऊ, तेरे नामसे मर जाऊ हे गाणे घेऊन एंन्ट्री केलेल्या राहुल सक्सेना याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. त्यानंतर त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या खेळ मांडला देवा या गाण्याचे अप्रतिम सादरीकरण केले. त्यांच्या तुझ्या प्रितीचा विंचू मला चावला या गाण्यावर रसिकांनी फेर धरला. त्यांच्या प्रत्येक गाण्यावर प्रेक्षकांना अक्षरश: नाचायला भाग पाडले.
त्यानंतर वैशाली सामंत यांनी आपल्या ऐका दाजीबा या हिट गाण्यावर मंचावर एन्ट्री केली. त्यानंतर कोकणची ओळख करून देणारे गोमू माहेरला जाते हो नाखवा...तिच्या घोवाला कोकण दाखवा हे गाणे सादर केले. वैशाली सामंत यांनी कोकणात येऊन कोकणचे गाणे गायचे नाही असे होऊ शकत नाही असे सांगून या गीताची सुरुवात केली आणि या गाण्याला प्रेक्षकांकडूनही तितकाच प्रतिसाद लाभला.
गुलाबाची कळी बघा हल्दीने माखली या गाण्यावर रसिकांनी जल्लोष केला. तसेच वैशाली सामंत यांच्या सुमधूर आवाजाची प्रेक्षकांना पर्वणी लाभली. त्यानंतर रसिकांच्या गळ्यातील ताईत ठरलेल्या आदर्श शिंदे यांनी जय मल्हार मालिकेतील जय देवा जय देवा जय श्री मार्तंडा हे गाणे सादर करीत आपल्या आवाजाची मोहिनी घातली.
शिंदे यांच्या एन्ट्रीलाच प्रेक्षकांनी टाळ््या आणि शिट्यांची दाद दिली. त्यानंतर आयुष्यात प्रत्येकाचा प्रेमात एकदा तरी ब्रेकअप होतो असे सांगत त्यांच्यासाठी त्यांनी आपल्या दुनियादारी चित्रपटातील देवा तुझ्या गाभाऱ्याला हे दुसरे गाणे सादर केले. त्यानंतर गजाल खरी काय अशा एकापेक्षा एक गाणी सादर केले.
संगीतकार व गायक स्वप्नील गोडबोले व सपना या जोडीने मला वेड लागले प्रेमाचे हे गाणे सादर केले. पुन्हा मंचकावर आलेल्या सक्सेना याने ह्यआई भवानी तुझ्या कृपेने गोंधळ मांडला... अंबे गोंधळाला ये, नदीच्या पल्याड आईचा गोंधळ लल्लाटी भंडार या दर्जेदार गाण्यांचा नजराणा सादर केला. तर वैशाली हिने कोंबडी पळाली, राणी माझ्या मळ्यामध्ये ही गाणी सादर करीत प्रेक्षकांचा निरोप घेतला.
प्रेक्षकांना अक्षरश: नाचविले...
सुंदरवाडी महोत्सवात उत्साहाने रसिक आले होते. आदर्शने आपली गाजलेली गाणी सादर करीत त्यांचे मनोरंजन केले. यात माझं काळीज लागलं नाचू गाणं वाजू द्या, आवड मला ज्याची, शिट्टी वाजली, हाताला धरलया ही गाणी सादर करून लहान मुलांसह तरुणांना ठेका धरायला लावला.
दरम्यान, पुन्हा व्यासपीठावर आलेल्या राहुलने प्रेक्षकांच्या उत्सुकतेत अधिकच भर टाकली. त्याने व्यासपीठावरून खाली उतरत प्रेक्षकांमध्ये जाऊन आपली गाणी सादर केली. यावेळी त्यांच्यासोबत ताल धरण्यासाठी त्यांच्याभोवती एकच गर्दी केली होती.