कुणकेश्वर यात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

By admin | Published: February 15, 2015 10:40 PM2015-02-15T22:40:38+5:302015-02-15T23:49:15+5:30

उद्यापासून यात्रोत्सव : मंदिर परिसरात वीज रोषणाई, सजावट, व्यापाऱ्यांची लगबग

Preparation of the Kukeshwar Yatra in the last phase | कुणकेश्वर यात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

कुणकेश्वर यात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

Next

कुणकेश्वर : शिवभक्तांची मांदियाळी ठरलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असून मंदिर व मंदिर परिसरात विद्युत रोषणाई, सजावट व दुकाने थाटण्यासाठी व्यापारी व कारागिरांची वर्दळ मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
कुणकेश्वर यात्रोत्सव यावर्षी १७ व १८ फेब्रुवारी रोजी होत असून तळकोकणात होणाऱ्या प्रमुख उत्सवांमध्ये हा महत्वाचा यात्रोत्सव गणला जातो. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यांसोबत मुंबईस्थित चाकरमानी राज्यातील इतर भागातील शिवभक्तांसोबतच लगतच्या कर्नाटक व इतर राज्यातील भाविकही मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवितात. यावर्षी यात्रोत्सव कालावधी दोन दिवसांचा असूनही पूर्ण दिवस अमावास्या असल्यामुळे पवित्र स्नानासाठी देवस्वाऱ्या व भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे व त्या दृष्टीने देवस्थान कमिटी व प्रशासन यांनी नियोजन केले आहे. यात्रास्थळी भाविकांना येण्यासाठी एस. टी. प्रशासनाने १०१ एस. टी. बसेसचा ताफा सज्ज ठेवला आहे. भाविक प्रवासासाठी खासगी वाहनांचा वापर करणार आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन एकेरी वाहतूक पार्किंगचे सुनियोजित सोय आदी मार्गांचा अवलंब करत आहे. वाहतूक कोंडी सुटावी आणि यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी १६ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत याठिकाणी जाणाऱ्या वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दल, राखीव पोलीस दल विशेष मेहनत घेत आहेत. अन्न प्रशासन विभागामार्फत यावर्षी यात्रोत्सवातील खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आढावा बैठकीत आरोग्य विभाग, तटरक्षक दल, जिल्हा प्रशासन, पंचायत समिती प्रशासन, ग्रामपंचायत आदींना यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बांधकाम विभागामार्फत परिसरातील रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली आहे. यात्रा काही तासांवर येवून ठेपली असतानाही काही ठिकाणी रस्त्याची साईडपट्टी रस्त्यालगतची झाडी मार्गदर्शक फलक आदी कामांबाबत कार्यवाही संबंधित बांधकाम खात्यामार्फत करण्यात आलेली नाही.
वीज वितरण कंपनीमार्फत सर्व मुख्य वाहिन्यांची दुरुस्ती करण्यात आली असून काही ठिकाणी नवीन वीजवाहिन्या बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. खंडित वीजपुरवठ्याची गैरसोय टाळण्यासाठी जादा विद्युतदाबाच्या जनरेटरची सोय यावर्षी देवस्थान कमिटीमार्फत करण्यात आली आहे. यात्रोत्सवासाठी मुंबईवरून रविवारी सायंकाळी कुणकेश्वर येथे २५० भक्तगणांसह रथयात्रा निघाली. तसेच नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत कुणकेश्वर मंदिर परिसर, समुद्रकिनारा व रस्ते यांची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्याबद्दल देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी आभार मानले. कुणकेश्वर यात्रोत्सवानिमित्त तीन दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावणार आहेत. येणाऱ्या लाखो भाविकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रशासनाला हाताशी धरत देवस्थान मंडळातर्फे नियोजन करण्यात आले आहे. (वार्ताहर)


देवस्वाऱ्यांनी संपर्क साधा
यावर्षी श्री देव रवळनाथ (वायंगणी), श्री देव लिंगेश्वर-पावणाई (साकेडी), स्वयंभू महादेव पावणाई (वळीवंडे), रामेश्वर सातेरी (त्रिंबक), श्री महादेवगिरी (माईण), श्री देवी भगवती, गांगेश्वर देवस्थान (आंब्रड) या देवस्वाऱ्या व त्यांच्यासोबत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून देवस्थान कमिटीशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री देव कुणकेश्वर देवस्थान कमिटी अध्यक्ष प्रभाकर पेडणेकर यांनी केले आहे.

तीन मजली दर्शन मंडपाची सोय
भाविकांना कमीतकमी वेळेत सुलभपणे दर्शन घेता यावे म्हणून तीन मजली दर्शन मंडपाची सोय करण्यात आली आहे. दर्शनरांगांसोबत भाविकांना सरबत व पाणीवाटप होणार आहे.
भाविकांचा ओघ वाढल्यास व दर्शनरांगांमधून दर्शनाला जास्त कालावधी लागत असल्यास मुखदर्शनाचा मार्ग देवस्थान ट्रस्टमार्फत अवलंबिला जाणार आहे.
यात्रा कालावधीत यात्रा परिसर समुद्रकिनारी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
पोलीस प्रशासनानेसुद्धा सुरक्षितततेच्या दृष्टीने टॉवर व साध्या वेषातील पोलीस कर्मचारी यांचे नियोजन केले आहे. ते चोवीस तास सेवा देणार आहेत.

Web Title: Preparation of the Kukeshwar Yatra in the last phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.