पर्ससीन नौकांची होतेय घुसखोरी स्थानिक मच्छिमारांची ठरतेय डोकेदुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 05:09 PM2018-09-02T17:09:45+5:302018-09-02T17:10:10+5:30
नव्या मासेमारी हंगामाची सुरुवात 1 आॅगस्टपासून झाली तर अधिकृत पर्ससीनधारकांची मासेमारी शनिवारपासून सुरू झाली.
मालवण : नव्या मासेमारी हंगामाची सुरुवात 1 आॅगस्टपासून झाली तर अधिकृत पर्ससीनधारकांची मासेमारी शनिवारपासून सुरू झाली. अशा परिस्थितीत शनिवारी पहिल्याच दिवशी किल्ल्यापासून निवतीच्या समुद्रात दहा ते बारा वाव समुद्राच्या आत परराज्यातील शेकडो हायस्पीड तसेच पर्ससीनधारकांनी घुसखोरी केल्याचे दिसून आले. रात्रीच्यावेळी या हायस्पीड आणि पर्ससीनच्या नौकांवरील लख्ख प्रकाश किनारपट्टीजवळ दिसून आला. याबाबतची माहिती स्थानिक तसेच निवतीतील मच्छिमारांनी दिली.
सध्या किना-यालगत स्थानिक पारंपरिक तसेच रापणकर मच्छीमारांना मासळीची चांगल्या प्रमाणात मासळी मिळत आहे. चांगली मासळीच्या कॅचमुळे सुखावत असलेल्या मच्छीमारांना परराज्यातील हायस्पीड, पर्ससीनची घुसखोरी डोकेदुखी ठरत आहे. यातच पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने जिल्ह्याच्या सागरी हद्दीत घुसखोरी केलेल्या परराज्यातील ट्रॉलर्समुळे मच्छीमारांमधील संघर्ष पुन्हा उफाळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नाराजीचे सूर
एकीकडे मच्छीमारांना मासळीची चांगली कॅच मिळत असताना सत्ताधारी आपल्याच पाठपुराव्यामुळे मासळी जाळ्यात येत असल्याचे सांगत आहेत. मग दुसरीकडे परराज्यातील हायस्पीड, पर्ससीनधारकांची घुसखोरी, अतिक्रमण का थांबविले जात नाही असा प्रश्न मच्छीमारांमधून विचारला जात आहे. या प्रकारामुळे स्थानिक मच्छिमारांत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.