नीलेश राणे यांच्याकडे धुरा द्या
By Admin | Published: January 15, 2016 11:19 PM2016-01-15T23:19:23+5:302016-01-16T00:52:24+5:30
संतोष मांढरे : मंडणगड तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी
मंडणगड : रत्नागिरी जिल्हा काँग्रेस (आय) पार्टीला पक्षाचे गतवैभव परत मिळवून देण्यासाठी माजी खासदार व युवा नेते नीलेश राणे यांनी जिल्हा काँग्रेसच्या नेतृत्वपदाची धुरा आपल्या खांद्यावर घ्यावी, अशी मागणी मंडणगड तालुका काँग्रेसी कार्यकर्ते करीत असल्याची प्रतिक्रिया तालुका काँग्रेस सरचिटणीस संतोष मांढरे यांनी पत्रकरांना दिली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर गेल्या वर्षभरात जिल्हा काँगे्रसला मोठी घरघर लागली आहे. जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदान क्षेत्रात पक्षात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. शिवसेना व राष्ट्रवादीच्या लाटेत काँग्रेसचे अगदी पांरपरिक मतदानही पक्षाला शक्य झाले नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसची सदस्य नोंदणी सोडता जिल्ह्यात पक्षाच्या वतीने पक्षवाढीसाठी गेल्या वर्षभरात कोणाताही ठोस कार्यक्रम हाती घेण्यात आलेला नाही़ या कालावधीत शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्न गंभीर झाले आहेत, याचा राज्य शासनाला जाब विचारण्याची वेळ आली आहे. धर्मनिरपेक्ष तत्वतज्ञानाच्या आधारे देशातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची सव्वाशे वर्षांची गौरवशाली पंरपरा या देशात केवळ काँग्रेस पक्षाला लाभली आहे. जिल्ह्यातील राजकारणात शिवसेनेच्या राजकारणाला सक्षम पर्यायांची आजही आवश्यकता आहे. पक्षाकडे युवक व बुजुर्ग अशा कार्यकर्त्यांचा सुरेख मेळ आहे. प्रत्येक जाती धर्माचे लोक या पक्षात कार्य करत आहेत, असे असताना केवळ सक्षम नेतृत्त्वाअभावी जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढीचा वेग मंदावला आहे. या पार्श्वभूमीवर तरुण, तडफदार व सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या व पक्षाचे दीर्घकाळ नेतृत्व करु शकेल, अशा युवा नेतृत्त्वाकडे जिल्ह्याचे नेतृत्व जाण्याची आवश्यकता आहे. युवानेते माजी खासदार नीलेश राणे यांच्याकडे नेतृत्त्वास आवश्यक असणारे सर्व गुण आहेत, याचबरोबर सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे कौशल्य त्यांच्यात आहे. मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत तालुक्याने त्यांच्या नेतृत्त्वाचे गुण व मार्गदर्शन यांची प्रचिती घेतली आहे.
त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे नेतृत्व माजी खासदार राणे यांनी स्वीकारावे, असे तालुक्यातील तमाम ज्येष्ठ व युवा कार्यकर्त्यांचे मत आहे. जिल्हा काँग्रेसचे नेतृत्व डॉ. राणे यांनी स्वीकारावे, यासाठी तालुक्यातील निवडणूक कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ लवकरच पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची भेट घेऊन तशी आग्रही मागणी करणार आहे, अशी माहिती संतोष मांढरे यांनी पत्रकारांना दिली. (प्रतिनिधी)
वाली कोण? : जिल्ह्यात संपर्क सुरूच
रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेसला सध्या कोणीच वाली नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते वाऱ्यावर पडले आहेत. या कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी विधानसभा निवडणुकीनंतर नीलेश राणे यांनी जिल्ह्यात संपर्क ठेवून कार्यकर्त्यांना आधार दिला आहे.