सात ‘स्कुबा’ प्रशिक्षण केंद्रांना मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 11:27 PM2017-08-11T23:27:08+5:302017-08-11T23:27:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी शासनाने कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यांत ७ ठिकाणी ‘स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्र’ व आंबोली येथे ‘साहसी क्रीडा प्रशिक्षण केंद्र’ सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यासाठी शासनाने २ कोटी ४0 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी दिली.
किनारपट्टी भागातील भूमी पुत्रांना रोजगाराची संधी निर्माण व्हावी यासाठी शासनाने सन २0१५ पासून कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध पर्यटनाच्या ठिकाणी पर्यटन स्थळांचा विकास केला जात आहे. जिल्ह्याच्या पर्यटनाला आणखी चालना मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने आंबोली येथे ‘साहसी क्रीडा प्रशिक्षण केंद्र’ व सात ठिकाणी ‘स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्र’ व्हावीत, असा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. या स्कुबा सेंटरमध्ये शिरोडा-रेडी-सागरतीर्थ, सागरेश्वर-उभादांडा, निवती-भोगवे, वायरी-भूतनाथ-तारकर्ली, तोंडवली-हडी-वायंगणी, विजयदुर्ग-तिर्लोट, कुणकेश्वर-तांबळडेग या ठिकाणांचा समावेश आहे. शासनाने आता ही प्रशिक्षण केंद्रे सुरु करण्यास मान्यता दिली असून त्यासाठी २ कोटी ४0 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
यातील १0 लाख रुपयांचा निधी ‘साहसी क्रिडा प्रशिक्षण केंद्रासाठी तर उर्वरित २ कोटी ३0 लाख स्कुबा ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रासाठी खर्च केला जाणार आहे. ही प्रशिक्षण केंद्र मंजूर व्हावित यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी विशेष प्रयत्न केले असल्याची माहिती रणदिवे यांनी दिली. ही प्रशिक्षण केंद्रे स्थानिकांना चालविण्यासाठी देण्यात येणार आहेत. यासाठी स्थानिक स्तरावर निविदा काढण्यात येणार आहे.
५0 जणांना स्कुबाचे प्रशिक्षण दिले जाणार
जिल्'ात सात ठिकाणी मंजूर करण्यात आलेल्या स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्रामार्फत एकूण ५0 जणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात ४0 जण स्कुबा डायव्हर म्हणून तर १0 त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे नियंत्रक म्हणून असणार आहेत. या सर्वांना मालवण तारकर्ली येथील इसदा संस्थेमार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण घेणारे उमेदवार त्या ठिकाणी रहावे यासाठी त्यांच्याकडून ५ वर्षाचे बंदपत्रक (करार) करून घेण्यात येणार असल्याची माहिती रणदिवे यांनी दिली.
प्रशिक्षण केंद्राची माहिती वेबसाईटवर
जिल्ह्यातील नव्याने मंजूर स्कुबा ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र व साहसी क्रीडा प्रशिक्षण केंद्राची माहिती जिल्ह्यासह जगातील पर्यटकांना मिळावी यासाठी एक अधिकृत वेबसाईट (संकेतस्थळ) तयार करण्यात येत आहे. या संकेतस्थळानुसार या प्रशिक्षण केंद्राची माहिती पर्यटकांना मिळणार आहे.