गुहागर तालुक्यात आरपीआय, काँग्रेस दिशाहीन

By admin | Published: February 19, 2017 12:32 AM2017-02-19T00:32:00+5:302017-02-19T00:32:00+5:30

नव्याने तालुकाध्यक्ष निवड न झाल्याने तालुक्यातील काँग्रेस ‘बॅकफूट’वर गेली आहे

RPI in Guhagar taluka, Congress will be without direction | गुहागर तालुक्यात आरपीआय, काँग्रेस दिशाहीन

गुहागर तालुक्यात आरपीआय, काँग्रेस दिशाहीन

Next

गुहागर : जिल्हा परिषद आणि गुहागर पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी, भाजप व शिवसेनेमध्ये तिरंगी लढत होणार आहे. या लढतीत आरपीआय व काँग्रेस मात्र दिशाहीन झाल्याचे चित्र आहे. गेली वर्षभर तालुक्यात काँग्रेसचे तालुकाध्यक्षपद रिक्त आहे. गतवेळच्या निवडणुकीत तालुकाध्यक्ष प्रदीप बेंडल यांच्या नेतृत्वाखाली मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडून जागा वाटपात सन्मानजनक वागणूक न मिळाल्याने काँगे्रसने सर्व जागांवर निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. यापूर्वी राष्ट्रवादीचे सभापती नंदकिशोर पवार यांच्या कारकीर्दीत पाटपन्हाळे गणातून निवडून आलेल्या एकमेव काँगे्रस सदस्य स्मिता बेलवलकर यांना उपसभापतीपद भूषविण्याची संधी मिळाली होती. प्रदीप बेंडल यांच्यानंतर अब्बास कारभारी नवे तालुकाध्यक्ष झाले. त्यानंतर तालुक्यात पक्षाला उभारी मिळेल, अशी आशा निर्माण झाली असताना ‘जैसे थे’च स्थिती राहिली. त्यानंतर अब्बास कारभारी यांनी तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन वर्षभराचा कालावधी उलटला, तरी नव्याने तालुकाध्यक्ष निवड न झाल्याने तालुक्यातील काँग्रेस ‘बॅकफूट’वर गेली आहे. यावेळी जिल्हा परिषद गट पडवेसाठी भरलेला एकमेव उमेदवारी अर्ज गजानन गडदे यांनी मागे घेतला तर पंचायत समिती गण खोडदेसाठी राजेंद्र अनंत साळवी हे एकमेव उमेदवार काँगे्रसकडून रिंगणात आहेत तर जिल्हा परिषद गट अंजनवेलमध्ये शंकर बाबुलनाथ गुरव, पालशेतमध्ये विजय शंकर विचारे निवडणूक रिंगणात आहेत. काँगे्रसचे माजी तालुकाध्यक्ष प्रदीप बेंडल या उमेदवारांसोबत प्रचार करीत असून, गुहागर तालुक्यात सध्या काँग्रेसची दिशाहीन झाल्यासारखी राजकीय स्थिती आहे.
आरपीआयचीही तालुक्यात काँगे्रससारखीच स्थिती असल्याचे दिसत आहे. दोन टर्मपूर्वी सुरेश सावंत यांनी सर्व जागांवर आरपीआयचे उमेदवार उभे केले होते. यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार अवघ्या काही मतांच्या फरकाने पराजीत होऊन भाजप-सेनेकडे सत्ता गेली. त्यानंतर सुरेश सावंत यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला व उपसभापतीपदही भूषविले. काँग्रेस व आरपीआयकडून निवडक जागांवरच उमेदवारी अर्ज भरल असून, त्यातीलही काही अर्ज ऐनवेळी मागे घेतल्याने दोन्ही पक्ष सध्या दिशाहीन झाल्याचे दिसत आहेत. (प्रतिनिधी)


आरपीआयचा स्वतंत्र लढण्याचा निर्णय
निवडणूकीत आरपीआय मित्र पक्ष भाजप सोबत राहील, असे वाटत असताना राष्ट्रवादीतून भाजपमध्ये सुरेश सावंत यांचा पक्षप्रवेश झाल्याने येथील आरपीआय नेत्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेत अंजनवेल पालशेत व पडवे गट तसेच पंचायत समितीच्या पालपेणे, पालशेत, वेळणेश्वर वखोडदे गणातून उमेदवार उभे केले. यामधूनही गळती होत पालशेतमधून दिलीप हिरामण मोहिते, वेळणेश्वर मधून सुनील महादेव गमरे तट पडवे गटातून विद्याधर राजाराम कदम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.


गेले वर्षभर गुहागरात काँग्रेसचे तालुकाध्यक्षपद रिक्त.
नव्याने निवड न झाल्याने काँग्रेस ‘बॅकफूट’वर.
पडवे जिल्हा परिषद गटातून गजानन गडदेंचा अर्ज मागे.
काँग्रेसबरोबरच आरपीआयचीही स्थिती दिशाहीनच.

Web Title: RPI in Guhagar taluka, Congress will be without direction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.