सडुरेत अवतरले ‘प्रतिशिराळे’
By admin | Published: January 6, 2017 11:20 PM2017-01-06T23:20:54+5:302017-01-06T23:20:54+5:30
वार्षिक गावपळण : आठवड्यासाठी गाव झाले सुने-सुने
वैभववाडी : पुर्वजांच्या हातून घडलेल्या पातकाचे प्रायश्चित म्हणा किंवा ग्राम देवतेवरील श्रध्दा! पण शिराळे मात्र प्रतिवर्षीप्रमाणे शुक्रवारी सायंकाळी पुरते सुनेसुने झाले. दुपारी तीनच्या सुमारास गावपळणीसाठी शिराळेवासियांनी आठवड्याचे गाठोडे घेऊन पाळीव प्राणी, पक्षांसह गावकुसाबाहेरचा मार्ग चोखाळला. त्यामुळे शिराळे गाव निर्मनुष्य होऊन पुरते सुनेसुने झाले. सुमारे पन्नास कुटुंबांच्या अडीचशे लोकवस्तीचे शिराळे सडुरेच्या माळावर जेमतेम २५ ते ३0 गुंठ्यात वसलेले दिसते. आठवडाभर ही वस्ती ‘प्रतिशिराळे’ म्हणूनच ओळखली जाईल.
शिराळेची वार्षिक गावपळण संपूर्ण कोकण पट्ट्यातील सर्वात मोठी गावपळण असून ती नित्यनेमाने आणि त्याच श्रद्धाभावाने आनंदात पार पाडली जाते. ‘नाडेघोरीप’ करण्यासाठी बांधलेली शीव मोकळी झालीच नाही तर शेताच्या राखणीला उपयुक्त ठरेल, या हेतूने शिराळेवासियांच्या पुर्वजांच्या हातून पातक घडले. आणि याचे प्रायश्चित म्हणून पातक मुक्तीसाठी ग्रामदेवतेने गाव ओस ठेवण्याची आज्ञा केली. तीच आज्ञा पालन म्हणून कित्येक पिढ्या शिराळेवासिय दरवर्षी गावपळण करीत आहेत, अशी आख्यायिका तेथील वृद्ध जाणकार सांगतात. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास आठवड्याची शिदोरी घेऊन पाळीव पक्षी, प्राण्यांसह शिराळे वासियांनी घराचा उंबरठा ओलांडला. वृद्ध, स्त्रिया, लहान मुले एसटीने सडुरेच्या 'वास्तव्य'स्थळी दाखल झाली. तर पुरुष मंडळी पाळीव प्राणी, पक्षांसमवेत सुमारे पाच किलोमीटर पायपीट करून अंधार पडता पडता ‘प्रतिशिराळे’त पोहोचली. गावपळणीमुळे सर्वांचे चेहरे वेगळ्याच आनंदाने पुलकित झाले होते.
शनिवारपासून पाच सहा दिवस कोणत्याही ताणतणावाशिवाय निसर्गाच्या सानिध्यात सर्व शिराळेवासिय गुण्यागोविंदाने 'एन्जॉय' करताना पहायला मिळतील. पाचव्या दिवशी श्री देव गांगोकडे परतीचा कौल मागितला जाईल, आणि ग्रामदेवतेच्या आदेशानंतर शिराळे गाव पुन्हा गजबजलेले दृष्टीस पडेल.
प्रशासनही पाळते आज्ञा
गावपळणीच्या काळात शिराळेची शाळाही सडुरेच्या माळावरील आंब्याखाली भरते. गावात जाणाऱ्या एस. टी. बससुद्धा 'प्रतिशिराळे'तूनच वळून माघारी फिरतात. याचे कारण म्हणजे गावकऱ्यांच्या ग्रामदेवतेवरील श्रद्धेला बाधा पोहोचू नये एवढेच आहे. त्यामुळे गावकऱ्यांप्रमाणे प्रशासनाचे प्रतिनिधीही अशा पद्धतीने गावपळणीत सामील झालेले दिसून येतात.